Breaking News

जुना दगडी पूल खचल्याने रहदारीला अडथळा

अहमदनगर, दि. 01, नोव्हेंबर - तालुक्यातील नान्नज येथील जामखेड-नान्नज रस्त्यावरील नान्नज येथील जूना दगडी पूल खचला असून जमिनीखाली गेला आहे. यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खचलेल्या पुलावरून जाण्या-येण्यासाठी पर्यायी व्यवस्था  करण्याची मागणी गावकर्यांनी वारंवार केली आहे . मात्र पर्यायी व्यवस्था लवकर न केल्यास  तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
नान्नजपासून जामखेडकडे जाणारा रस्ता फक्त एक किमी अंतरावरदेखील नाही. अनेक वर्षांपासून हा पूल थोडा थोडा खचत चालला आहे. त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पुलावरून पाणी वहात आहे. त्यामूळे खचलेल्या रस्त्याचा अंदाज वाहन चालवताना येत नाही. वाहन चालकांसह सर्वच प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे . एक महिन्यात 20 ते 25 मोटारसायकलवरून पडून नागरिक जखमी झाले आहेत. त्या पुलावरून महिलांसह लहान मुलेही पडली आहेत. या पुलावर मोठया वाहनांचे इंजिन खड्डयांत जमिनीला घासून अनेक वाहनांचे इंजन फुटले आहे. यामुळे खूप वाहनांचे नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात तर अनेक वेळा वाहनातून प्रवाशांना खाली उतरून पायी चालत पूल पार करावा लागतो. रस्त्यावरून जाणार्या पुलावरून जाणार्‍या पाण्याची कींवा रस्त्याची पर्यायी व्यवस्था लवकर करण्याची मागणी वाहनधारकांनी व नागरीकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. मात्र अद्याप या विभागाने काहीही केलेले दिसत नाही. सोलापूरसह चार जिल्हयाच्या सरहद्दीवर नान्नज हे गाव आहे जामखेड - नान्नज - जवळा गावापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यांच्या साईडपट्याही उखडल्या आहेत. अनेक ठिकाणी मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तालुक्यातील अनेक रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे.