Breaking News

जलयुक्त पावले ‘साखरखेर्ड्या’चे शिवार फुलले

बुलडाणा, दि. 07, नोव्हेंबर - जिल्ह्यातील अर्वषण ग्रस्त तालुका असलेला सिंदखेड राजा. कायम पाणीटंचाईने ग्रासलेला.. त्यातही साखरखेर्डा परीसर कायम पाणीटंचाईग्रस्त. अशा  टंचाईग्रस्त भागाला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी या भागात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. 26 हजार लोकसंख्येचे मोठे गाव असलेल्या साखरखेर्डा गावाचा समावेश  जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला. गावच्या शिवारात मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. या कामांमुळे परिसरात पडून वाहत जाणार्‍या पावसाचे  पाणी जमिनीत मुरत आहे. परिणामी विहीरींची पाणी पातळी वाढून रब्बी हंगाम शेतकरी घेत आहे.
एवढ्या मोठी लोकसंख्या असलेल्या गावच्या पाणी पुरवठ्याची समस्या जलयुक्त शिवार अभियानामुळे भूजल पातळीत वाढ झाल्यामुळे निकाली निघण्यास यश मिळाले आहे. गावाला  ऐतिहासिक व पौराणिकदृष्ट्या महत्वसुद्धा लाभलेले आहे. गावाच्या अवती भवती महालक्ष्मी, गायखेडी व काळ्या पाण्याचे असे तीन तलाव आहे. गावाला कोराडी प्रकल्पातून पाणी पुर विल्या जाते. गाव शिवारात 90 कामे मंजूर करण्यात आली, तर 79 कामे करण्यात आली आहे. या संपूर्ण कामांची माहिती सिमनीक संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.
साखरखेर्डा गावच्या शिवारात या अभियानातंर्गत सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे व खोलीकरण यासह ढाळीच्या बांधाच्या कामांना शेतकर्‍यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.  अभियानाच्या पहिल्या वर्षी साखरखेर्डा गावाची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे परिसरात 17 बंधार्‍यांचे खोलीकरण व रूंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे परिसरातील  विहीरींना जलसंजीवनी मिळाली आहे. त्याचप्रमाणे गावाच्या आसपास असलेल्या महालक्ष्मी, गायखेडी व काळ्या पाणी असलेल्या तलावातील लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर गाळ  काढण्यात आला.
सिंदखेड राजा तालुक्यात साखरखेर्डा येथे 13 ठिकाणी नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले. सिमेंट नाला बांध, महालक्ष्मी व गायखेडी तलावांमधील अंदाजे 2 लाख 30 हजार ट्रॉली  गाळ काढण्यात  आला आहे. त्यामुळे मागील 10 ते 15 वर्षात न दिसणार्‍या विहीरींना पाणी आले आहे. तसेच कमी पाणी असणार्‍या विहीरींची पाणी पातळी वाढली आहे. गावाची  जलयुक्त शिवार अभियानातंर्गत निवड झाल्यानंतर गावात दिंडी, भजन अशा पारंपारिक माध्यमांतून जलजागृती करण्यात आली. तसेच शिवार फेरी काढून गाव शिवारातील  जलसंधारण कामांचे ठिकाण निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे अवर्षण पट्ट्यातील शेतकरी फळबागेकडे  वळला आहे.
डाळींब फळपिक शेतकरी घेत आहे. तसेच फुलशेतीकडे शेतकरी वळत पारंपारिक शेतीतून आधुनिक शेतीकडे वळला आहे. हा बदल सर्व भूजल पातळी वाढल्यामुळे झाला असून  साखरखेर्डा गावचे शिवार पाणीदार झाले आहे. भूजल पातळी जलयुक्त शिवार अभियानामध्ये जलसंधारण व मृद संधारणाची  कामे प्रभावीरित्या झाल्यामुळे निश्‍चितच वाढली आहे.