Breaking News

जानेफळ येथे रंगणार कबड्डीचा महासंग्राम

18 नोव्हेंबर रोजी खा. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार उद्घाटन

बुलडाणा, दि. 07, नोव्हेंबर - मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील जय संतोषी माता क्रीडा मंडळ व गावकरी मागील सहा वर्षांपासून राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन  शिवाजी हायस्कूलच्या मैदानात करत आहेत. यंदाही या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दि.18 नोव्हेंबर 2017 पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे  उद्घाटक खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष गजूभाऊ वडणकर हे राहणार आहेत. 
या कबड्डी स्पर्धेसाठी 1 लाख 74 हजार रुपयांची बक्षीसे जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम बक्षीस-71 हजार रुपये, द्वितीय बक्षीस-51 हजार रुपये, तृतीय बक्षीस-31 हजार  रुपये, चतुर्थ बक्षीस-21 हजार रुपये असून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट रेडरसाठी हिरो मोटारसायकल बक्षीस देण्यात येणार आहे. तर उत्कृष्ट डिफेंडरसाठी एलईडी टीव्ही बक्षीस देण्यात  येणार आहे.
जानेफळ येथे आयोजित या कबड्डी स्पर्धेसाठी देशभरातील नामांकित प्रो कबड्डी लिगचे खेळाडू येणार आहेत. मागील वर्षी 2016 च्या स्पर्धेत आकर्षण ठरले होते ते राज्यस्तरीय क बड्डी स्पर्धेत व एशियन स्पर्धेत खेळलेले खेळाडू त्यामध्ये यवतमाळच्या जयहिंद संघाचे मंजित राठी, तेलगु टायटनचा शशांक वानखेडे, श्रीकांत जाधव, मंजील तवर, अजिंक्य खापरे,  महालीगचा खेळाडू सुनिल दुबिले, यांचा खेळ बघण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यंदाही मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू स्पर्धेत भाग घेणार  असल्याने नागरिकांमध्ये उत्सूकता निर्माण झाली आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू अचलपूर यांच्याहस्ते होणार आहे.
तरी या स्पर्धेसाठी ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी अमोल राजपूत मो.9637970550, अमोल गवई मो.9420239325 यांच्याशी संपर्क साधावा व या स्पर्धेसाठी जास्तीत  जास्त संघांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.  या स्पर्धेसाठी आयोजकांच्या वतीने चांगल्या पद्धतीने तयारी सुरु असून परिसरातील  जास्तीत जास्त नागरिकांनी व क्रीडा रसिकांनी उपस्थित राहून या सामन्यांचा आनंद घ्यावा. यंदाची ही कबड्डी स्पर्धा कबड्डीप्रेमींसाठी मेजवानीच ठरणार आहे.