Breaking News

शेती कामासाठी मजूर देता का कोणी मजूर?

अहमदनगर, दि. 2, नोव्हेंबर - परराज्यातील  शेतंमजूराच्या भरवशावर शेती व्यवसाय अडचणीत सापडला असून यापूर्वी स्वतः येऊन शेती काम करत असताना यंदा मात्र मजुरांना  परराज्यात  घ्यायला जाऊनही मजूर येत नसल्याने शेतातील खरिप पिकांची काढनी तर रब्बीतील कांदा लागवडीसाठी शेतकर्‍यांची मोठया प्रमाणात धावपळ होते आहे. परिणामी  शेतकर्‍यांवर ‘मजूर देता का कोणी मजूर?’ असे म्हणण्याची वेळ येथील शेतकर्‍यांवर आली आहे.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून महाराष्ट्रात सतत दुष्काळसदृश परिस्थिती राहिली आहे. त्यामुळे ऊसाचे माहेर घर असणार्‍या राज्यातच ऊसाच्या क्षेत्रात कमालीची घट झाली. शेतकरी  भुसार मालाकडे वळला. परंतु या कामांसाठी शेतमजुरांची मोठया प्रमाणात गरज भासते. यांमध्ये स्थानिक मजुराची कमतरता भासत असल्याने गेल्या दहा ते  बारा वर्षांत अत्यल्प  प्रमाणात तर चार-पाच वर्षांत मोठया प्रमाणावर तालुक्यातील शेतकर्‍यांनी हजारो परप्रांतीय शेतमजूर आणून आपली शेती पिकविण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदा खरिपात एक महिना वगळता पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने खरीपातील सोयाबीन, बाजरी व मका पिकाचे पूर्णतः नुकसान झाले  आहे. परंतु या पिकांची काढणी केल्याशिवाय रब्बीतील बागायती कांदा, गहू, तर जिरायती हरभरा व ज्वारीची पेरणी व लागवड  शक्य आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची मजुरांसाठी धांदल  उडाली आहे.
परराज्यातील शेतमजूर कुटुंब आणल्यानंतर त्यांना राहण्याची सोय करून द्यावी लागते. त्यांच्या सर्व गरजा तसेच लाड पुरवावा लागतो. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता यंदा मात्र  या उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. मजूराचादेखील चांगलाच भाव वाढला आहे. इतर वेळी फक्त दूरवध्वनीवर संपर्क साधल्यास शेकडो मजूर येत  असत. परंतु तालुक्यातील  बरेच शेतकरी या मजुरांना आणण्यासाठी गेले असता हे मजूर येण्यास तयारच होत नाहीत. त्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला असल्याचे चित्र सध्या कोपरगाव तालुक्यात  निर्माण झालेले दिसत आहे.
कोपरगाव तालुक्यात बर्‍याच वर्षांपासून स्थानिक मजूर कमी झाल्याने  येथील शेतकरी परप्रांतीय शेतमजूर आणून शेती व्यवसाय करत आहे. परंतु स्थानिक मजुरांची कमी होत  असलेली संख्या व भुसार पिकांचे दिवसेंदिवस वाढत असलेले क्षेत्र व यावर तात्पुरत्या स्वरूपात परप्रांतीय मजूर यामुळे येत्या काळात शेती व्यवसाय मोठया प्रमाणावर अडचणीत  येण्याचे चिन्हे दिसत आहेत.