Breaking News

ठाणे-बेलापूर सर्व्हिस रस्त्याचे विस्तारीकरण होणार

नवी मुंबई, दि. 03, ऑक्टोबर - ठाणे-बेलापूर रस्त्या लगतच्या सर्व्हिस रस्त्याचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी 1 कोटी 63 लाख रुपये खर्च  होणार आहे. सध्या ठाणे - बेलापूर रस्त्याबाजूचा पूर्वेकडील सर्व्हिस रस्ता हा केवळ रबाळे अग्निशमन दल ते बोनकोडे जंक्शन पर्यंतच आहे. यापुढे फिलिप्स कंपनीपर्यंत या सर्व्हिस  रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या मार्गाचे विस्तारीकरण केल्याने मुख्य ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुकीची कोंडी फुटणार आहे. तसेच नागरिकांना एमआयडीसीत  ये-जा करण्यासाठी सोयीचे ठरणार आहे. हा रस्ता 280 मीटर लांबीचा असून 11 मीटर रुंदीचा असणार आहे. त्याच प्रमाणे या रस्त्याच्या बाजूला एका बाजूला पावसाळी गटर व  दोन्ही बांजूंना 2 मीटर रुंदीचे पदपथ असणार आहे. हे काम करतांना पाण्याची पाईप लाईन व महावितरणच्या विद्युत केबल स्थलांतरित करण्यात येणार आहे. तसेच या मार्गावर  दिवाबत्तीचीही सोय करण्यात येणार आहे. पूर्वी हा मार्ग एमआयडीसीकडे असतांना त्याची पुरती चाळण झाली होती; मात्र महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यावर तो काँक्रीटचा करण्यात  आला. तेव्हा पासून या मार्गावरून जेएनपीटी, पुणे व नवी मुंबई एमआयडीसीत जाणा-या अवजड व हलक्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी रबाळे जंक्शन,  तळवली, ऐरोली नाका, दिघा या ठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत आहे. याची दखल घेत सध्या या मार्गावर एमएमआरडीए मार्फत उड्डाण  पुल बांधण्याचे काम सुरू आहे; मात्र हे काम धिम्या गतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडली आहे. ही वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पुन्हा महापालिकेने पुढाकार  घेऊन फिलिप्स कंपनीपर्यंत सर्व्हिस रस्त्याचे विस्तारिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव देखील मंजूर झाला असून लवकरच निविदा काढण्यात येणार  असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली.