Breaking News

रात्री चहा पिण्यासाठी बाहेर आलेल्या 3 विद्यार्थ्यांचा करुण अंत


सोलापूर, दि. 20, नोव्हेंबर - सोलापूरपासून 10 कि.मी अंतरावर असलेल्या तळे हिप्परगा रोड येथील अपघातात 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 1 विद्यार्थी गंभीर जखमी असून त्याच्यावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पहाटे 3 च्या सुमारास पेट्रोलिंग करताना पोलिसांच्या ही बाब लक्षात आली. चारही विद्यार्थी हे नागेश ऑर्चिड अभियांत्रिकी महाविद्यालाचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. संगमेश माळगे, अक्षर असबे, दिपक गुमडेल असे मृत विद्यार्थ्यांचे नाव असून हेमंत थळंगे असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुखदेखील शासकीय रुग्णालयात पोहोचले आहेत.
चौघेही मेकॅनिकल शाखेचे विद्यार्थी आहेत. ते तृतीय वर्षामध्ये शिकत होते. 21 नोव्हेंबरला परीक्षा असल्याने महाविद्यालयाने 24 तास ग्रंथालय सुरु ठेवले आहे. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी हे चौघेही विद्यार्थी काल शनिवारी रात्री 9 वाजता महाविद्यालयात आले होते. नंतर रात्री अडीचच्या सुमारास चहा पिण्यासाठी दोन दुचाकी घेऊन ते बाहेर निघाले. याचदरम्यान रस्त्यावरील भरधाव ट्रकने त्यांना मागून धडक दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पहाटे 3च्या सुमारास या मार्गावर पेट्रोलिंग करताना पोलिसांना दोन दुचाक्या आणि चौघेजण जखमी अवस्थेत दिसले. त्यांना ताबडतोब शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत 3 जणांची प्राणज्योत मावळली होती. एक विद्यार्थी हेमंत थळंगेवर सध्या उपचार सुरु आहेत. पीएसआय बी.एस. बिराजदार या घटनेचा अधिक तपास करत आहेत.