Breaking News

संसदीय लोकशाहीला धोका तर नाही ना?

क्रांती म्हणजे पारंपारिक अवस्थेत होणारा आमुलाग्र बदल. हा बदल पूर्वीच्या अवस्थेचे कुठलेही अवशेष शिल्लक ठेवीत नाही. तेव्हाच खर्‍या अर्थाने क्रांती झाली असे म्हटले जाते. या बदलाची नोंद इतिहासाला घ्यावीच लागते. हेच वेगळ्या शब्दात सांगायचे म्हटले तर मुळ अवस्थेकडून प्रगतशील अवस्थेकडे नेणारी स्थिती म्हणजे क्रांती... हे गृहीत धरले तर प्रगतीची बीजे क्रांतीत दडली आहेत, असे मानायचे का? म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही देखील, कारण या बदलाचे आयुष्यमान ठरलेले असते.


बदल सामावून घेणारी तत्कालीन परिस्थिती जोवर पोषक आणि पुरक असते तोवर हा बदल सोसला जातो आणि नंतर मात्र हळूहळू पुन्हा प्रतिकुल वातावरणात हा बदल अस्वीकार्य ठरून नव्या बदलाचे संक्रमण सुरु होते. भौतिक शास्त्राच्या सिद्धान्ताप्रमाणे न्युटनच्या तिसर्‍या नियमाची प्रचिती येऊ लागते. 

अ‍ॅक्शन अ‍ॅण्ड रिअ‍ॅक्शन इज इक्बल अ‍ॅण्ड अपोझीट. हा बदल एखाद्या रासायनिक अभिसरण प्रकियेत अणू-रेणू एकमेकांवर धडकावेत अशा पद्धतीने घडू लागतो. नेमके हेच चित्र आज आपल्या समाज व्यवस्थेत दिसते आहे. आज सुरु असलेल्या सामाजिक अभिसरण प्रकियेत समाज व्यवस्थेत घट्ट बसलेल्या विविध समाज घटकांचे अणू-रेणू विस्कळीत होऊन एकमेकांना धडकण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 

याचाच अर्थ एका नव्या क्रांतीचे संकेत मिळू लागले आहेत. इथे मात्र एका गोष्टीचा आवर्जुन उल्लेख करणे क्रमप्राप्त आणि तितकाच अपरिहार्य आहे. समाज व्यवस्था आणि राजव्यवस्था जेव्हा एकमेकांशी पुरक नसतात, एकमेकांना पोषक नसतात, तेव्हा होणारी क्रांती विशेषतत्त्वे गांभीर्याने घ्यावी लागते. 

अशा परिस्थितीत होणारी क्रांती योग्य दिशेने नेली नाही तर मोठा विनाश अटळ ठरू शकतो, हे मुद्दामहून इथे नमूद करणे आवश्यक आहे. कारण आजची राजव्यवस्था आणि समाजव्यवस्था यात सुरु असलेले शीतयुद्ध आणि त्यातूनच जन्माला आलेले किंवा घातले गेलेले सामाजिक अभिसरण यांचा वेध घेऊन अचूक घेतला गेला नाही तर उद्या देशांवर मोठा पश्‍चाताप करण्याची वेळ येऊ शकते. 

विद्यमान राजव्यवस्थेचा हेतू दिसतो तितका सरळ आणि साधा नक्कीच नाही. राजव्यवस्थेच्या मनात वेगळेच डाव शिजत आहेत. या डावांना अंजाम कसा द्यायचा हे खरे तर आपल्या समाजासमोर आव्हान आहे. हे कटू अन् तितकेच विखारी सत्य दुर्लक्षित झाले तर मोठी किंमत समाजाला मोजावी लागेल. आपली समाजव्यवस्था शेकडो वर्षापासून एका चौकटीतील बंधाने विविध समाज घटकांशी घट्ट बांधली गेली आहे. मात्र गेल्या चार-दोन वर्षात हे बंध विस्कळीत होऊ लागल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. 

आज आपला समाज एकमेकांविरूद्ध अचानक उभा ठाकलाय. शेकडो वर्षाच्या रोटी व्यवहारातून बेटी व्यवहारापर्यंत बदल स्वीकारणार्‍या समाजव्यवस्थेत अचानक इतके टोकाचे मतभेद का निर्माण झालेत? समाजव्यवस्थेतील ही भाऊबंदकी इतकी टोकाला का गेली? कुणाला फायदा होणार आहे या पेटलेल्या संघर्षातून? या संघर्षातून धर्मांध व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न गेली काही वर्षे सातत्याने केला जात आहे.

त्याचाही विचार करावा लागेल. त्यांच्यामध्ये वैयक्तीक विचारांमध्येही बदल घडवावा लागेल. सध्या जग आर्थिक विकासाच्या दिशेना मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे जगातील सर्वच देशांचे राज्यकर्ते आर्थिक गुंतवणूक आणि व्यापाराचा व्यवहार यावरच आपले लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे धर्मांध विचारांचा प्रभाव हा दिवसेंदिवस संकुचित होत जाणार असुन त्याला नव्या पिढीच्या विचारांमध्ये स्थान मिळणार नाही. 

कारण नवी पिढी ही वैज्ञानिक विचार करणारी असल्यामुळे या पिढीला धर्मभावना भडकावून रस्त्यावर उतरविता येणार नाही याची जाण देशातील प्रतिगामी शक्तीला आता येवू लागली आहे. या संघर्षात आपल्या लोकशाहीची संसदीय व्यवस्था बेचिराख तर होणार नाही ना? या प्रश्‍नांची उत्तरे शोधूनच खरे तर समाजातील प्रत्येकाने टाकायला हवे.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा