अयोध्येत राम मंदिर,आणि लखनौमध्ये मशीद बनवा !
अयोध्येतील वादग्रस्त जागेवर भगवान श्री राम यांचे मंदिर बनावे, जेणेकरून हिंदू-मुस्लिम यांच्यातील वादावर कायमचा पडदा पडेल. परिणामी देशात धार्मिक सलोखा कायम राहील, आणि मुस्लिमांनी बाबरी मशीद अयोध्येत बनवण्याचा हट्ट धरू नये. त्याऐवजी लखनौमधील हुसैनाबाद स्थित घंटा घरच्या समोर शिया वक्फ बोर्डाच्या जमिनीवर मशीद साकारली पाहिजे, असे रिझवी यांनी प्रस्तावात नमूद केले आहे.
वरील प्रस्ताव गेल्या शनिवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. त्यास दिगंबर आखाड्याचे सुरेश दास, हनुमान गढीचे धर्मदास, निर्मोही आखाड्याचे भास्कर दास याशिवाय राम विलास वेदांती, गोपालदास व नरेंद्र गिरी आदींनी पाठिबा दिला आहे. वरील सर्व हिंदू धर्मगुरूंशी बातचीत केल्यानंतरच शिया वक्फ बोर्डाने प्रस्ताव तयार केला आहे.
अयोध्या वाद कायमचा मिटवण्यासाठी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी पुढाकार घेऊन सादर केलेल्या आपल्या प्रस्तावात म्हटले आहे की, कोणत्याही मुस्लिम शासकाच्या नावे मशीद बांधण्यात येऊ नये. त्या ऐवजी 'मशीद-ए-अमन' असे मुस्लिम प्रार्थनास्थळ बनवण्यात यावे. यामुळे भविष्यात कोणताही वाद निर्माण होणार नाही, असा तर्क बोर्डाने दिला आहे. वरील तोडग्यावर सुन्नी वक्फ बोर्ड मात्र सहमत नाही. सुन्नी वक्फ बोर्डाने फेटाळून लावला आहे.
