Breaking News

शहरात विकासाला चालना फक्त शिवसेनेमुळे -मा.आ.अनिल राठोड

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात विकासाला चालना फक्त शिवसेनेमुळे मिळाली आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रभागात मुलभुतप्रश्‍न सोडविण्यासाठी मनापासून काम करत आहे. नालेगावातील रस्ता काँक्रीटीकरण व बंदपाईप गटार कामाचा अत्यंत ज्वलंत प्रश्‍न मार्गी लावण्यात आल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते मा.आ. अनिल राठोड यांनी केले.


प्रभाग क्र.22 नालेगाव मधील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा ते नवग्रह मंदिर पर्यंन्त बंदपाईप गटार व रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे भुमीपूजन मा.आ. राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मनपा सभागृह नेते गणेश कवडे, महिला बाल कल्याण समितीच्या उपसभापती सुनिता मुदगळ, नगरसेवक अनिल बोरुडे, दत्ता (तात्या) मुदगळ, प्रमोद दळवी, गणपतराव राऊत, संजय दळवी, चंद्रकांत कलवडे, राजेंद्र दळवी, अनंत फडके, योगेश पाठक, गिरीश मुळे, विनीत मुंगी, धनंजय पांडकर, संजय नाबरीया, धनंजय पाठक, अ‍ॅड.मंगेश दिवाणे, दिनकर देव तरसे आदिंसह नागरिक व विक्रांत गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

मा.आ. राठोड पुढे म्हणाले की, उताराच्या दिशेने नालेगावचा परिसर असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून स्थानिक नागरिकांची गैरसोय होत होती. बंदपाईप गटारच्या कामामुळे पाणी न साचता एक दर्जेदार रस्ता नागरिकांना उपलब्ध होणार आहे. सभागृह नेतेपदी कवडे यांची निवड झाल्यापासून या भागात विविध विकासात्मक कामे मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर सुरेखा कदम यांनी गणेश कवडे यांच्या पाठपुराव्याने महापौर निधीतून सदर काम सुरु करण्यात आल्याचे स्पष्ट केले. अनेक वर्षापासूनचा या भागातील प्रश्‍न सोडविण्यात आला असून, हे काम उत्कृष्ट दर्जाचे होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

गणेश कवडे म्हणाले की, रस्ता खराब झालेला असताना स्थानिक नागरिकांनी पाठपुरावा केल्याने हा रस्ता महापौर निधीतून मंजूर करण्यात आला. बंदपाईप गटारचे काम संपल्यावर फेज-2 ची पाईपलाईन टाकून, रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. नालेगावमध्ये होणारा रस्ता अत्यंत दर्जेदार असणार असून, पहाण्यासारखा राहणार आहे. शहराच्या विकासासाठी विकासाच्या मुद्दयावर काम केले जात असून, येणार्‍या निवडणुकित विकासाच्या मुद्दयावर सर्वसामान्य जनता शिवसेनेमागे ठामपणे उभी राहणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

संभाजी कदम म्हणाले की, कामाची गरज ओळखून नालेगावमध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळ्यात या भागात नेहमीच पाणी साचत असल्याने हा प्रश्‍न कायमचा शिवसेनेने निकाली काढला आहे. विरोधक राजकारण करताना शहरात कोणत्या पध्दतीचे विकास कामे चालू असल्याचा मुद्दा उपस्थित करतात. त्यांना हे काम उत्तर राहणार आहे. शहरात गरज ओळखून विकासात्मक कामे मार्गी लावले जात आहे. शहराचे वाटोळे मागील सत्ताधार्‍यांनी केले. ते सुधरविण्याचे काम शिवसेना करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा