Breaking News

तालुकानिहाय जनता दरबार 13 नोव्हेंबरपासून - मनीषा पवार

नाशिक, दि. 02, नोव्हेंबर - जलसंपदा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या जनता दरबारात जिल्ह्यातील दोन गावांना जोडणार्‍या गावशिव रस्त्यांवरून रस्त्यांची कामे  रखडल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या अशा रखडलेल्या शिवरस्त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी बांधकाम व अर्थ सभापती मनीषा पवार यांनी  तालुकानिहाय जनता दरबार आयोजित करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
या संदर्भात तालुकानिहाय दौर्‍याचे नियोजन लवकरच जाहीर करू, असे बांधकाम सभापती मनिषा पवार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री गिरीश महाजन  यांच्या जनता दरबारात निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील अनेक शिवरस्त्यांची कामे केवळ त्यांचे वर्गीकरण व सर्वेक्षण न झाल्याने रखडलेल्या कामाबाबत पालकमंत्री गिरीश  महाजन यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर केवळ निफाड तालुक्यातील नव्हे तर संपुर्ण नाशिक जिल्ह्यातील रस्त्याबाबत तक्रारींचे निवारण करावे, त्यावर तोडगा काढण्यात  यावा, अशी सूचना आ. अनिल कदम यांनी गिरीश महाजन यांच्याकडे केली होती.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शिवरास्त्यांच्या सर्वेक्षणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फ़त तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. या पार्श्‍वभूमीवर  गावनिहाय सर्वेक्षण व मोजणी न झालेल्या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी तालुकानिहाय जनता दरबार आयोजन करण्याबाबतचे नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम  सभापती मनिषा पवार यांनी हालचाली सुरु केल्या आहेत.