Breaking News

अनिकेत कोथळे खून : हवालदार अनिल लाडला 12 दिवसांची पोलिस कोठडी

सांगली, दि. 11, नोव्हेंबर - सांगली शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस कोठडीतील आरोपीच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या निलंबित गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलिस हवालदार अनिल लाड याला येथील मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. खापे यांनी शुक्रवारी 12 दिवसांची पोलिस कोठडी दिली.
कोल्हापूर रस्त्यावरील लूटमारी प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे (वय 26, रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) या आरोपीचा गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, अनिल लाड, अरूण टोणे, नसरूद्दीन मुल्ला, राहूल शिंगटे व झाकीर पट्टेवाले या सहाजणांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला होता. हा खून पचविण्यासाठी या सर्वांनी अनिकेत कोथळे व त्याच्या साथीदाराने पलायन केल्याचा बनावही केला होता. वास्तविक, या सर्वांनी अनिकेत कोथळे याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता.
या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांनी सांगली पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे व अतिरिक्त पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे यांना सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यात युवराज कामटे याच्यासह त्याच्या साथीदारांनी केलेल्या मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी या सर्व सहा आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली होती.
यातील युवराज कामटे, अरूण टोणे, नसरूद्दीन मुल्ला, राहूल शिंगटे व झाकीर पट्टेवाले या पाच जणांना काल गुरूवारी येथील न्यायालयात हजर केले असता 12 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. मात्र अरूण लाड याला या गुन्ह्याकामी तपासासाठी आंबोली घाट येथे नेण्यात आल्याने तो न्यायालयात गैरहजर होता. आज अनिल लाड याला बुरखा घालून येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी या आरोपीला पाहण्यासाठी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.