Breaking News

एसटी संप : अन्यथा कंत्राटी कामगार भरू

मुंबई, दि. 18, ऑक्टोबर - एसटी कर्मचार्‍यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संप सुरु होऊन 24 तासांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. आज कामावर न परतणार्‍या एसटी कर्मचार्‍यांचं  निलंबन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनानं दिला आहे. संप पुकारणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना सरकारनं अल्टिमेटम दिला आहे. तसंच निलंबित कर्मचार्‍यांच्या जागेवर कंत्राटी क र्मचार्‍यांची भरती करण्यात येईल, अशी तंबी देखील देण्यात आली आहे.
सोमवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या संपामुळे ऐन दिवाळीत गावी जाणार्‍या सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या मागणीसह  इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेनं राज्यव्यापी संप पुकारला आहे. पुढची 25 वर्ष एसटी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे  पैसाच नाही, असं म्हणत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचार्‍यांची मागणी धुडकावून लावली आहे. शिवाय एसटी कर्मचार्‍यांचा संप बेकायदेशीर असून त्यामागे काँग्रेसचा  हात असल्याचा गंभीर आरोपही रावतेंनी केला आहे.