Breaking News

त्रास न देता भुयारी गटर योजनेचे काम करण्याच्या अधिकार्‍यांना सुचना

सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : शासनाच्या अमृत योजनेतून सातारा शहरासाठी भुयारी गटर योजना मंजूर झाली आहे. ही योजना सातारकरांसाठी हितकारक आहे.  शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम करताना रस्ते खुदाईमुळे सातारकरांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे भुयारी गटर योजनेचे काम  करताना एकदम रस्ते खुदाई न करता आवश्यक तिथेच खुदाई करा. सातारकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये, याची दक्षता घेवून योजनेचे काम वेळेत पुर्ण  करा, अशा सुचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना केल्या. 
सातारा शहरात मंजूर झालेल्या भुयारी गटर योजनेची कशाप्रकारे अंमलबजावणी केली जाणार आहे? वाढीव पाणीपुरवठा योजनेप्रमाणे या योजनेचे काम करताना  सातारकरांना त्रास होवू नये, याची दक्षता घेण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. अधिकार्‍यांना सुचना करताना आ.  शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी नगर पालिकेचे विरोधी पक्षनेते अशोक मोने, नगरसेवक शेखर मोरे पाटील, शकिल बागवान, बाळासाहेब खंदारे, अतुल चव्हाण,  सौ. दिपलक्ष्मी नाईक, सौ. लिना गोरे, सौ. मनिषा काळोखे, सौ. संगिता धबधबे, सौ. सोनाली नलवडे यांच्यासह प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता आर. बी. आंटद,  जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत आंटद यांनी प्रस्तावित भुयारी गटर योजनेबाबत नकाशाद्वारे सविस्तर माहिती दिली. गेल्या दोन- अडीच वर्षांपासून शासनाने अमृत योजनेतून  राज्यातील पालिकांच्या भुयारी गटर योजनेला मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे. याच योजनेत सातारा शहराच्या भुयारी गटर योजनेचा समावेश आहे. 2050 वर्षांची  लोकसंख्या लक्षात घेवून या योजनेचे काम होणार आहे. ओढे नाले स्वतंत्र असून भुयारी गटर योजनेसाठी स्वतंत्र वाहिनी टाकण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात  50.30 कोटी रुपयांचे काम केले जाणार असून हे काम करताना रस्ते खुदाई होणार असल्याचे आंटद यांनी सांगितले. शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम  करत असताना सुरेंद्र इंजिनियर या एजन्सीच्या गलथानपणाचा फटका सातारकरांना बसला होता. रस्त्यांच्या बेसुमार खुदाईमुळे सातारकरांना नाहक त्रास सहन करावा  लागला होता. त्यामुळे अशी कोणतीही परिस्थिती निर्माण होवू नये, यासाठी प्राधिकरणाने दक्षता घ्यावी. शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होवू नये. आवश्यक त्या  ठिकाणी अभ्यास करुनच रस्ते खोदावेत अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आंटद यांना केल्या. तसेच चांगल्या एजन्सीकडे काम द्या, जेणेकरुन काम दर्जेदार  आणि वेळेत पुर्ण होईल, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटर योजना मंजुरीचे प्रस्ताव एकत्रच पाठवले होते. मात्र पाणीपुरवठा योजना पुर्ण झाल्याशिवाय भुयारी गटर योजनेला मंजूरी दिली  जात नसल्याने ही योजना शासनाने आता मंजूर केली आहे. योजनेसाठी रस्ते मधोमध खोदावे लागणार आहेत. रस्ते खुदाईमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची  दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्राधिकरणाने नगर पालिकेकडे काम आहे, असे म्हणून आपली जबाबदारी झटकू नये. काम दर्जेदार होण्यासाठी प्राधिकरणाच्या  अधिकार्‍यांनी कामावर लक्ष ठेवावे. या योजनेचा फायदा सातारकरांना होणार असल्याने योजनेला सहकार्य करतील, असा विश्‍वास आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त  केला.