Breaking News

पोषण आहाराचे धान्य खरेदीवर शिक्षकांचा बहिष्कार

सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : आम्हाला फक्त शिकवू द्या, अध्यापनाचे काम करु द्या, अशी आर्त हाक देत ऑनलाईन कामावर, शालेय पोषण आहारातील धान्य  खरेदीवर बहिष्कार टाकण्याचा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटनांनी एकत्र येत एकमुखी निर्णय घेतला. यासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास  शिंदे यांना निवेदन दिले. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती, अखिल भारतीय शिक्षक संघ, क्रास्ट्राईब शिक्षक संघटनांनी  एकत्रित येऊन प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून निर्णय घेतला आहे. 
त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की प्रशासनाने मागील तीन वर्षापासून सर्वच शालेय कामे ऑनलाइन पध्दतीने भरण्याचे धोरण अवलंबिले आहे. ही सर्व  माहिती इंटरनेटच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना भरावी लागते. डोंगरी भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे खासगी व्यक्तींकडून माहिती भरुन घ्यावी लागते.  त्याचा परिणाम अध्यापनावर होत असतो. ’आरटीई’च्या शिक्षण कायद्याप्रमाणे सर्व शिक्षकांना फक्त अध्यापनाचे काम द्यायचे आहे. त्यामुळे यापुढे शासनाने शालेय  संगणक सुविधा, इंटरनेट सेवा, तसेच ही सर्व कामे करण्यासाठी संगणक चालक नेमावेत. शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवावी. सातारा जिल्हा  परिषदेने 1 ऑक्टोबरपासून धान्य, मालाची खरेदीचे पत्रक काढले आहे. त्याला सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांचा विरोध आहे. हा माल खरेदी करणार नाही. पूर्वीप्रमाणे  दर महिन्याला माल पुरवठा व्हावा, तसेच मार्च 2017 पासून प्रलंबित इंधन बिल, भाजीपाला, पूरक आहार, स्वयंपाकी मानधन त्वरित मिळावे, अशीही मागणी केली  आहे. सर्व शिक्षकांनी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडावे, असे आवाहन संघटनांनी केले आहे. निवेदनावर मच्छिंद्र मुळीक, मच्छिंद्र ढमाळ, प्रशांत मोरे, राजेंद्र बोराटे  यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.