Breaking News

गाड्या चोरून ते नातेवाईकांना मौज करायला द्यायचे .. !

जालना, दि. 18, ऑक्टोबर -  चोरी केलेल्या दुचाकींचा वापर करून ते हौसमजा करत फिरायचे. विशेष म्हणजे चोरलेल्या गाड्यां नातेवाइकांनाही वापरायला द्यायचे. इतरांच्या  मदतीने विक्रीही करायचे. मात्र, पोलिसांना याची खबर मिळाली. विशेष कृती दलाच्या पथकाने दोन चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक-दोन नव्हे तर तब्बल तेरा दुचाकी  जप्त केल्या. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे लखन नारायण आढे व विलास उर्फ पिन्या गुणाजी आढे (रा. परतवाडी  तांडा. ता. परतूर,जि.जालना) अशी आहेत. जालना शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून वरील दोघे दुचाकींची चोरी करत असल्याची माहिती विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक  यशवंत जाधव यांना खबजयांमार्फत मिळाली होती. त्यानुसार कृती दलाच्या पथकाने परतवाडी तांड्याहून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी जालना शहर, आष्टी तसेच अन्य  ठिकाणांहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच अन्य दोघांनी चोरलेल्या दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशान घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघा संशयितांकडून तीन लाख 30  हजार रुपये किमतीच्या तेरा दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणात सहभागी असणा-या इतरांचा पोलीस शोध घेत आहेत. या पूर्वी चोरीच्या दुचाकी कुणाला विक्री केल्या याचाही  तपास पोलीस करत आहेत. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक  यशवंत भंडारे , एम. बी. स्कॉट, रामप्रसांद रंगे, संदीप चिंचोले, राजू पवार, कृष्णा देठे, संदीप भोसले, भालचंद्र गिरी, अनिल राठोड यांनी ही कारवाई केली.