Breaking News

मुलाच्या मृत्यूनंतर अवयव दान करण्याचा निगडीतील दाम्पत्याचा निर्णय

पुसेसावळी, दि. 2 (प्रतिनिधी) : मुंबईच्या एका खासगी कंपनीत इंजिनिअर असलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आई, वडिलांसह कुटुंबीयांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण मुलाच्या मृत्यूचं डोंगराएवढं दु:ख बाजूला सारून या कुटुंबाने त्याचे अवयव दान केले. मुलाचा मृत्यू झाला असला तरी त्याच्या अवयवाच्या रुपाने आणखी कोणाचा तरी मुलगा वाचेल, असा विचार करीत या कुटुंबाने हा आदर्शवत निर्णय घेतला.
कराड तालुक्यातील निगडी गावातील चंद्रकांत घोलप हे अल्पशिक्षित आहेत. त्यामुळे कंपनीत नोकरी करून चंद्रकांत हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. काही वर्षांपूर्वी ते पत्नी कुसूम व तीन आपत्यांसह उदरनिर्वाहासाठी मध्य प्रदेशमध्ये गेले. काही वर्षांनी संबंधित कंपनी बंद पडली. अखेर पुन्हा हे कुटुंब मध्य प्रदेशातून नाशिकला गेले. त्याठिकाणी चंद्रकांत व कुसूम यांनी दोन मुले व मुलीला शिकवले.  चंद्रकांत व कुसुम यांचा धाकटा मुलगा लोकेश याने उच्च शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तोही नवी मुंबईला भावाकडे राहण्यास गेला. त्याठिकाणी एका कंपनीत इंजिनिअर या पदावर काम करत होता.
गुरुवारी लोकेश कार्यालयाला जाण्यासाठी निघाला. त्याचा मित्र त्याला घेण्यासाठी घरापर्यंत आला. दोघे दुचाकीवरून कंपनीत निघाले होते. काही अंतरावरच त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यात लोकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तेथील वाहतूक पोलिसांनी लोकेश याला उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल केले. मात्र, तीन दिवस उपचार घेतल्यानंतर लोकेशचा ब्रेन डेड झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे घोलप कुटुंबीय शोकसागरात बुडाले. लोकेश याचे अवयव दान करण्याचा सल्ला डॉक्टरांनी घोलप कुटुबियांना दिला. मुलाच्या मृत्यूचे दु:ख असतानाही त्यावर विचार करून लोकेशच्या आई, वडील बहीण व भाऊ यांनी लोकेशचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलाचा मृत्यू अटळ आहे, अशा स्थितीत त्याचे अवयव दान केल्यास किमान चार ते पाच जणांचे प्राण वाचतील हे जाणून घेऊन लोकेशचे वडील चंद्रकांत घोलप यांनी अवयव दान करण्यास मान्यता दिली असल्याचे सांगितले.