Breaking News

संतोष पोळ याने 36 खून केल्याचा दावा

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) : वाई-धोम खून खटल्यातील मुख्य सूत्रधार कथित डॉ. संतोष पोळ याने एकूण 36 खून केले असल्याचा दावा न्यायालयासमोर केला आहे. त्यामुळे पोलिसांनीही तो म्हणत असेल, तर चौकशी करतो असा पवित्रा न्यायालयात घ्यावा लागला आहे. यावर पुढील सुनावणी दि. 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 
पोळची कृत्ये समोर आल्यानंतर जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली होती. अत्यंत थंड डोक्याने त्याने खून सत्र चालविले होते. पोलिसांनी तपासदरम्यान प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गोष्टी सांगून तो गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता. यावरुन तो अत्यंत चलाख असल्याचे अनेकदा समोर आले.
सध्या डॉ. पोळवर जिल्हा न्यायालयात खटला सुरु आहे. खटल्याचे मुख्य कामकाज सुरु होण्यापूर्वीच सहा खुनांचे खटले एकत्र चालवायचे की स्वतंत्र, माफीची साक्षीदार होते की नाही इथपर्यंतच खटल्याचे काम पोचले आहे. खटल्यातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिच्यावर कशा प्रकारे दबाव निर्माण करता येईल याचीही चाचपणी दावे-प्रतिदाव्यातून सुरु आहेत. आताही संतोष पोळ याने न्यायालयासमोर नवा दावा केल्याचे समोर आले आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वी त्याने न्यायालयात अर्ज केला आहे. त्यात एकूण 36 जणांचा खून केल्याचा दावा केला आहे. पोलीस तपासात सहाच खुनीचे गुन्हे समोर आले आहेत. त्यामुळे इतर 30 कोण हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. न्यायालयाने याबाबत पोलीस दलाकडे विचारणा केली. त्यानंतर संतोष पोळ म्हणत असला, तर तपासासाठी त्याला ताब्यात घेऊन चौकशी करावी लागेल, असा पवित्रा पोलिसांना घ्यावा लागला आहे. त्यावर न्यायालय काय निर्णय घेणार याची प्रतीक्षा आहे.