Breaking News

दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने चाकरमानी घराच्या वाटेवर

सातारा, दि. 17 (प्रतिनिधी) : बाहेर गावी असणारे चाकरमानी दिपावलीच्या सुट्ट्या लागल्याने गावाकडे परतू लागल्याने सातारा बसस्थानक परिसर प्रवाशांच्या गर्दीने गजबजला  होता. तर बसस्थानकातून येणार्‍या-जाणार्‍या सर्व गाड्या हाऊसफुल्ल असल्यासचे चित्र पहावयास मिळत आहे. 
शनिवार-रविवारी शासकीय व खासगी कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना जोडून सुट्टी आली. त्यामुळे नोकरीनिमित्त सातारा जिल्ह्यात असणारे नागरिक आपल्या गावाकडे परतू लागले आहेत.  पुणे-मुंबई यासह अन्य ठिकाणी नोकरीनिमित्त असणारे नागरिक आपल्या गावाकडे दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर येवू लागले आहेत. दोन दिवसाची सुट्टी तर अनेकांनी  सोमवार-मंगळवारची रजा घेतली आहे. त्यानंतर 3 ते 4 दिवस दिवाळीची सुट्टी आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी गावाकडे दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. शाळा-महा विद्यालयांना शनिवारपासून सुट्ट्या लागल्यामुळे प्रवाशांचा एसटीने गावी जाण्यासाठी बसस्थानकात गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सातारा बसस्थानकातून पुणे व मुंबईकडे जाणार्‍या बसमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. तसेच बाहेरून येणार्‍या गाड्यांमध्येही प्रवाशांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.  त्यामुळे सर्वच लांब पल्ल्याच्या गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. सातारा बसस्थानकातील आरक्षण केंद्रावर आरक्षणासाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. बस भरल्यानंतर त्वरित  मार्गस्थ करण्यात येत होती. सातारासह अन्य आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता त्या-त्या मार्गावर विविध आगारातून जादा गाड्या  सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, सातारा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यामुळे सातारा रेल्वे स्थानकाला प्रवाशांच्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त  झाले होते.