Breaking News

शेकापचे ज्येष्ठ नेते भाई एस. एम. पाटील यांचे निधन

पुणे, दि. 23, ऑक्टोबर - माढ्याचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई संपतराव मारुती उर्फ एस. एम. पाटील (वय 89) यांचे अल्पशा आजाराने निधन  झाले. ते गेल्या पंधरा दिवसांपासून किडनीच्या आजारावर चिंचवड येथील बिर्ला हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होते. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून त्यांना श्‍वसनाचा जास्त त्रास होत  होता. आज रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
भाई एस. एम. 1967 ते 1972 दरम्यान माढा विधानसभेवर निवडून आले होते. ते सध्या रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे  ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. सध्या ते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. त्यांनी या बँकेचे 2008-09 साली उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. एस. टी.  महामंडळाचेही ते संचालक होते. एस. एम. पाटील यांनी 1942 च्या चलेजाव आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यानंतर ते प्रा. एन. डी. पाटील यांच्या संपर्कात आल्याने  शेतकरी कामगार पक्षाकडे ओढले गेले ते शेवटच्या श्‍वासापर्यंत शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या नेतृत्वात 2008 ला उजनी धरणातून नदीत पाणी सोडण्याच्या  मागणीसाठी काढलेला मशाल मोर्चा खूप गाजला होता. शेतसारा माफीसाठी व शेतकर्यांच्या विविध प्रश्‍नांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली.त्यांचे पश्‍चात एक भाऊ, पत्नी, दोन  मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांचेवर माढा तालुक्यातील वरवडे येथे सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.