Breaking News

गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या आठ पर्यटकांना जीवदान

रत्नागिरी, दि. 02, ऑस्टोबर - कोल्हापूर- सांगली येथून पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आलेले आठ तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने (दि. 30 सप्टेंबर)  गणपतीपुळ्याच्या समुद्रात बुडाले. मात्र जीवरक्षक दलाने या आठजणांचे प्राण वाचवल्याने मोठी जीवितहानी टळली.
सकाळी सांगली व कोल्हापूर येथून दोन ग्रुप पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे दाखल झाले. त्यातील एक ग्रुप डी. वाय. पाटील कॉलेजचा होता. तर दुसरा सांगली येथील  होता. दुपारी 12 वा.च्या सुमारास हे दोन्ही ग्रुप समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. यातील डी. वाय. पाटील कॉलेज ग्रुपमधील सहाजण तर सांगलीचे दोघे असे  मिळून आठजण एकाच वेळेस पाण्यात बुडू लागले. हा प्रकार त्यांच्या सहकार्यांनी पाहिला असता एकच आरडाओरड सुरू झाली. याचवेळी जय गणेश युवा मंडळ  जीवरक्षक दलाचे तरुण मदतीसाठी धावून आले. त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवून या आठहीजणांना समुद्रातून बाहेर काढले. त्यातील चौघांची प्रकृती गंभीर होती.  सर्वांना उपचाराकरिता तात्काळ देवस्थानच्या रुग्णवाहिकेतून मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
सांगली येथून आलेले रोहित पवार, शरद जाधव, प्रमोद डबडरे, महेश पशुरोगनर, सचिन सूर्यवंशी, उमेश घोडके हे सहा जण पोहायला उतरले होते. त्यांना पाण्याचा  अंदाज न आल्याने दोघे जण बुडू लागले. याच वेळी कोल्हापूर डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विद्यार्थीही याच भागात पोहायला उतरले होते. त्यापैकी सहा जण  पाण्यात बुडू लागले होते. या प्रकाराने दोन्ही गटांतील उरलेल्यांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला. तेथून जवळच दसर्यापासून पर्यटकांसाठी बोटिंग सुरू करण्यात  आले होते. ती बोट समुद्रातच होती. याच बोटीवरील प्रमोद डोर्लेकर व राज देवरूखकर या जीवरक्षकांनी बुडणार्या व्यक्तींना मदतीचा हात दिला आणि आठही जणांना  सुखरूप बाहेर काढण्यात जीवरक्षकांना यश आले. राज देवरूखकर, प्रमोद डोर्लेकर यांच्या मदतीला किनार्यावर असणारे जीवरक्षक उमेश म्हादये, महेंद्र झगडे, दिनेश  धावरे, जितु सुर्वे हे धावून गेले. सांगली ग्रुपचे दोघे व मूळचे हरियाणाचे युवक भारत चौधरी, विवेक कुंभार, सतीश पटेल, विक्रांत शर्मा यांना सुखरूप बाहेर काढण्यात  आले. कोल्हापूरचे भारत चौधरी व विक्रांत शर्मा हे दोघे गभीर होते. राज देवरूखकर यांनी या दोघांना सीपीआर (तोंडाने श्‍वास) दिला व देवस्थानच्या रुग्णवाहिकेतून  मालगुंड आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून या दोघांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी मालगुंड पोलिसांनी पंचनामा  करून सांगली व कोल्हापूर येथे दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची खबर दिली.