Breaking News

नारायण राणे यांच्या नविन पक्षघोषनेनंतर नाशिक मधील कार्यकर्त्यामध्ये जल्लोष

नाशिक, दि. 02, ऑस्टोबर - काँग्रेसला रामराम केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा करत राजकारणातील  आपली तिसरी इनिंग सुरू केली. यामुळे राज्याच्या राजकारणावर काय आणि कसा परिणाम होईल याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, राणे यांनी आज नवीन पक्षाची घोषणा केल्यानंतर नाशिकमधील त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत जल्लोष केला. जिल्ह्यात राणे समर्थकांची संख्या मोठी  असून लवकरच तालुका आणि वॉर्डनिहाय अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात येणार असल्याचे जिल्ह्याध्यक्ष डॉ. संदीप कोतवाल यांनी सांगितले.
2005 मध्ये शिवसेनेला हात दाखवत काँग्रेमध्ये दाखल झालेल्या नारायण राणे यांनी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला काँग्रेसलाही रामराम केला. त्यानंतर राणे  कोणत्या पक्षात प्रवेश करता? की स्वतंत्र पक्ष स्थापन करणार हा राज्यभर चर्चेचा विषय झाला होता. आज राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केल्यानंतर  या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
आता नाशिक जिल्ह्यातून राणेंना किती समर्थक मिळतात याविषयी चर्चा सुरू झाली आहे. कोकणातून नाशकात स्थायिक झालेल्या कुयुंबियांचा राणेंना पाठिंबा  असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप कोतवाल यांचे म्हणणे आहे. याशिवाय स्वाभिमान संघटना नाशिकमध्ये पूर्वीपासूनच सक्रिय आहे.
ही संपूर्ण संघटना जशीच्या तशी पक्षात विलीन झाली आहे. संघटनेने आजवर केलेल्या कार्याचा पक्ष विस्तारासाठी उपयोग होऊ शकतो. याशिवाय सातपूर औद्योगिक  वसाहतीत कार्यरत असलेल्या समर्थ कामगार युनियन राणे समर्थक असल्याचे बोलले जात आहे.
याशिवाय इतर समर्थकांना एकत्र करत जिल्ह्यात पक्ष विस्तारावर भर देणार असून आगामी सर्व निवडणुका लढवणार असल्याचे कोतवाल यांनी सांगितले. ‘महिला  सुरक्षा’ आणि ‘छेडछाडमुक्त नाशिक शहर’ ही संकल्पना घेऊन घराघरांत पोहोचणार असून सदस्य संख्या वाढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्ष विस्तारावर भर : नारायण राणे यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यावर आमचा भर असेल. इतर पक्षातून  येणार्यांचा सन्मान करून पक्ष विस्तार करणार आहे. लवकरच पक्षाची घटना तयार होईल. त्यानंतर तालुका आणि वॉर्डनिहाय अध्यक्षांची निवड करण्यात येईल.  अन्यायाविरुद्ध लढणा-या स्वाभिमान संघटनेने केलेले कार्य पक्ष विस्तारासाठी उपयोगी ठरणार आहे.
- डॉ. संदीप कोतवाल, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष