Breaking News

कास धरण परिसरातील वन विभागाची जमिन पालिकेच्या नावे करण्यास वन विभागाची मंजूरी

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) : कास धरण उंची वाढीसाठी आवश्यक वनखात्याच्या जमिनीचे फेरफार नगरपालिकेच्या नावाने करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाच्या नागपूर येथील क्षेत्रीय कार्यालयाने अंतिम मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसांत कास धरणाच्या बांधकामाचा प्रत्यक्ष प्रारंभ होईल, अशी माहिती सातारा पालिकेच्या नगराध्यक्ष माधवी कदम व नगरपालिकेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या प्रसिध्दिपत्रकात म्हटले आहे, की सन 1853 मध्ये कास धरण बांधण्यात आले. या धरणातून पूर्वी उघड्या पाटाने व सायफन पध्दतीने सुमारे 25 किलोमीटरुन सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. सातारा शहराची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन कास धरणाची उंची वाढविल्यास होणारा पाणीसाठा व ग्रॅव्हिटीने येणारे पाणी इत्यादीमुळे कमी खर्चात कायमस्वरुपी व मुबलक पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे तसा प्रस्ताव खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता. विविध खात्यांच्या मंजुरीची प्रक्रिया विचारात घेता, खासदारांनी वेळोवेळी संबंधित मंत्रालयाद्वारे पाठपुरावा केल्याने विविध मंजुर्‍या मिळत गेल्या.