Breaking News

कर्जबाजारीपणाला कंटाळून कोरगाव तालुक्यातील युवकाची आत्महत्या

वाठारस्टेशन, दि. 2 (प्रतिनिधी) : कोरेगाव तालुक्यातील दहीगाव येथील भूमिहीन युवा शेतकरी व व्यावसायिक सुशांत उर्फ बंटी भरत चव्हाण (वय 25) याने कर्जबाजारीपणाला कंटाळून साताररोड येथील जरंडेश्‍वर डोंगरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
दहिगाव येथील सुशांत भरत चव्हाण हा वाठार स्टेशन येथील एक हॉटेल चालवत होता. वडील भरत चव्हाण हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या आजारपणासाठी त्यांनी शेती गहाणवट ठेवली आहे. आपल्या वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करून शेती परत घेण्याची जिद्द ठेवत त्यांचा मुलगा सुशांत भरत चव्हाण हा शाळेला रामराम करत छोटे मोठे व्यवसाय करत होता. मात्र व्यवसायात त्याला म्हणावे तसे यश मिळत नव्हते. एका बाजूला व्यवसाय सांभाळताना दुसर्‍या बाजूने वडिलांच्या आजारपणाची त्याला चिंता लागली होती. हातउसने घेतलेले जवळपास 5 लाखाचे कर्ज त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. ज्यांच्याकडून त्याने हातउसने पैसे घेतले होते ते त्याला सतत पैसे मागू लागले. त्यामुळे त्याने अखेर कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.
मागील आठ दिवसांपूर्वी दि. 22 रोजी सुशांत याने वडिलांना वाठारस्टेशन येथे बोलवून बाजारासाठी पैसे दिले होते. त्यानंतर तो घरी आला नसल्याने त्याच्या वडिलांनी वाठार पोलीस ठाण्यात त्याच्या गायब होण्याची तक्रार दिली होती. यानंतर दोन दिवसांपूर्वी साताररोड येथील जरंडेश्‍वर पायथ्याला गर्द झाडीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. वडिलांच्या आजारपणामुळे तसेच वडिलांनी गहाणवट ठेवलेली शेती सोडवणे, व्यवसायासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी तो रात्रंदिवस धरपडत होता. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज ग्रामस्थ वर्तवत आहेत. त्याच्या पश्‍चात वडील, आई, बहीण असा परिवार आहे.