Breaking News

दीपावलीला गोवत्स पुजनाने सुरूवात

सातारा, दि. 17, ऑक्टोबर - गाय आणि तिचे वासरू या दोघांचे पुजन करून यावर्षीच्या दिवाळी सणाला येथे सुरूवात झाली. सातारा येथील पंचपाळे हौद दुर्गामाता मंदिर ट्रस्टचे  वतीने पुजनासाठी 10 गाय वासरांच्या जोड्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. महिलांनी दिवसभर औक्षण व पुजन करण्यासाठी गर्दी केली होती.
सध्या शहरात गाय वासराचे दर्शन ही दुर्मिळ झाले आहे. ही गरज लक्षात घेउन मागील 12 वर्षापासून पंचपाळे हौद दुर्गामाता मंदिर ट्रस्टचे वतीने दरवर्षी ही पुजनाची प्रथा सुरु केली.  या वर्षी या पुजनासाठी 10 गाय वासरांच्या जोड्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या.
सातारा शहरातील 2 सोनगाव येथील 4 आणि जकातवाडी येथील 4 गाय वासरांच्या जोड्यांना आज सकाळीच पुजन करुन उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात पुजनासाठी खास  व्यवस्था करण्यात आली होती, तसेच पुजनासाठी पंचारती, हळद कुंकु, फुले ठेवण्यात आली होती.गाईंना आकर्षकरंगाच्या झूलीही घालण्यात आल्या होत्या.
सकाळ पासूनच गोपुजन सुरू झाले असले तरी आज दुपारनंतर पुजनासाठी महिलांनी मोठी गर्दीं केली होती. तसेच अनेक पुरूषांनीही गाय वासराचे पुजन करुन भक्तीभावाने दर्शन  घेतले. गायवासरांच्या जोड्यांसाठी हिंमत जाधव, नितीन शिळमकर, प्रल्हाद निगडकर व सुरेश गायकवाड या शेतकरी कुटुंबांनी विशेष मदत केली. गाय वासराला पुजनानंतर बाजरी व  गुळ घालण्याची प्रथा आहे त्यामुळे मंदिर ट्रस्टचे वतीने गोमातेला पेंड, पशुखाद्य देणगी स्वरुपात भेट द्या असे आवाहन केले होते, त्यालाही सातारकरांनी मोठा प्रतिसाद दिला.