Breaking News

सातार्‍यात भर पावसातही दिवाळी खरेदीसाठी गर्दी

सातारा, दि. 17, ऑक्टोबर - दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. कपड़याबरोबर, उटणे, मोती साबण, तेल याचीही खरेदी जोरात चालली आहे. एकंदर शहराला  दिवाळीची चाहूल लागली आहे. दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे चैतन्य आणि दिवाळी म्हणजे नवीन कपडे. दिवाळी आणि नवीन कपडयांचे अतूट असे समीकरण आहे.  साड़यांच्या दुकानात महिलांची मोठी गर्दी दिसून येते आहे . सिल्क, पैठणी, शालू असा साडयांपेक्षा डिझानर साडयांना महिला जास्त पसंती देत आहेत. तर तरुणीमध्ये खादी  स्पेशल,इंडो वेस्टर्न कुडती ला तर तरुणांमध्ये डेनिम चे शर्ट व वॉश, जॉगर्सच्या जीन्सची क्रेझ आहे.ऑक्टोबर हा थंडीचा महिना. थंडीत आपली त्वचा उकलते. त्यामुळे तेल व उटणे  लावून आंघोळ केल्याने त्वचा चांगली राहते. दिवाळी थंडीतच येत असल्याने दिवाळीदिवशी तेल, उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. अभंग स्नानासाठी बाजारात अनेक प्रकारचे  तेल, साबण, उटणे आले आहेत. साबणामध्ये गुलाब, चंदन, मोती साबणाबरोबरच, केवडा, विभूती, अष्टगंध, उपटण, केसर, कोरफड, तुलसी, जास्मीन , खस, पंचामृत, मध असे  प्रकार आले आहेत. तसेच उटण्यात घालण्यासाठी हिना, अल्फान्सो,रातराणी, गुलाब अशा प्रकारचे अत्तर बाजारात उपलब्ध झाले आहेत. अभंग स्नानासाठी पूर्वी तीळाचे तेल लावले  जात होते. परंतु आता बाजारात वेगवेगळे सुगंधी तेल आले आहेत.मोबाईल, सोशल नेटवर्किंगच्या जमान्यातही दिवाळीचा शुभसंदेश पोहोचविण्यासाठी नागरिकांकडून भेट कार्डांना  पसंती दिली जात आहे. मराठी, हिंदी , इंग्रजी भाषेतील शुभेच्छापर मजकूर असलेल्या कार्डना सर्वसामान्य ग्राहकांकडून मोठ़या प्रमाणात पसंती दिली जात आहे. दिवाळीत आपल्या  आवडत्या व्यक्ती, नातेवाईक, स्नेही यांना शुभेच्छा पत्रे पाठवतो. हा एक आनंद उत्सवाचा भाग असतो.