Breaking News

कवी अनंत फंदी नाट्यगृह अजूनही प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत

अहमदनगर, दि. 02, ऑक्टोबर - संगमनेर नगरपरिषदेने काही वर्षांपूर्वी अतिशय दिमाखदार सोहळ्याने केलेल्या कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाला आता एक पंचवार्षिक उलटत आली आहे, परंतु या नाट्यगृहाचा श्‍वास अजूनही काही मोकळा होताना दिसत नाही. कधीकाळी कित्येक महान मराठी कलाकारांनी, साहित्यिकांनी, राजकारण्यांनी सुद्धा या नाट्यगृहाच्या व्यासपीठावर आपले अधिराज्य गाजवलेले संगमनेरच्या जनतेने बघितले आहे. 
कवी अनंत फंदीच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक कलावंत या शहरात घडले आणि त्यांना नावलवकिकही या व्यासपीठाने मिळवून दिले आहे. कांताबाई सातारकर, डॉ. सोमनाथ मुटकुळे, रघुवीर खेडकर, किशोर कदम, वसंत बंदावणे, सुधाकर बोराडे, केशव बोराडे, मोहन जोशी, राजु कोदे, राजन झांब्रे, प्रदीप तापडीया, घोडके इत्यादी व याही व्यतिरिक्त आणखी बर्याचशा कलावंतांचे योगदान संगमनेर शहराच्या नाट्य व कलेला लाभले आहे. एवढे वैभव या शहराला लाभले असताना सुद्धा त्याचा वापर सामान्य जनतेला किंवा कलाकारांना होऊ नये हि अत्यंत खेदाचीच बाब म्हणावी लागेल. पूर्वी जेंव्हा शहरात एखादे नाटक किंवा तमाशा यायचा त्यावेळी संपूर्ण तालुक्यातून मंडळी ते कार्यक्रम बघायला येत असत. परंतु आज परिस्तिथी अशी आहे कि शहरात कुठलाही कार्यक्रम, नाटके, शिबिरे, संमेलन आयोजित करण्यासाठी हक्काची जागा किंवा व्यासपीठ उपलब्ध नाही त्यासाठी त्यांना खाजगी सभागृहांकडे हात पसरावे लागतात.
संगमनेर शहर व तालुक्यातून चांगले कलावंत, राजकारणी घडवायचे असतील तर तरुणांना हक्काचे व्यासपीठ असणे हे तितकेच महत्वाचे आहे. संगमनेर नगरपरिषद या बाबतीत किती गांभीर्याने विचार करत आहे हे या नाट्यग्रृहाकडे बघुन लक्षात येते. सध्या नाट्यग्रृहाच्या नूतनीकरणाचे काम लाल फितीच्या कारभारात अडकल्याचे सांगितले जात आहे, बंदीस्त नाट्यग्रृहासाठी लागणारा 60 फुटी रस्ता, वाहनतळ, नाट्यग्रृहाच्या पाठीमागे लागूनच असलेली झोपडी वसाहत अशा अनेक समस्यांचे निवारण करावे लागणार आहेत, तोपर्यंत मात्र या नाट्यग्रृहातील रंगमंचावरचा पडदा सरकायला उशीर आहे असे म्हणायला हरकत नाही. संगमनेर तालुक्याच्या भरभराटीत प्रगतीत आ. बाळासाहेब थोरातांचा मोठा वाटा आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली असलेली संगमनेर नगरपरिषदेच्या अखत्यारीत असलेले हे नाट्यगृहला आणखी किती काळ प्रेक्षकांची वाट पाहावी लागेल हेच आता पुढील काळात बघायचे आहे.