Breaking News

औरंगाबाद प्रादेशिक महावितरणची ग्राहकांकडे नऊ हजार कोटींची थकबाकी

औरंगाबाद, दि. 15, ऑक्टोबर - औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या अकरा जिल्ह्यातील तेरा लाख वीज ग्राहकांकडे नऊ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. ग्रामीण भागात वीज सुविधा वाढविण्यासाठी महावितरणतर्फे बडे शेतकरी, बागायतदार आणि वीज बिल भरू शकणार्या वीज ग्राहकांकडून लवकरच वीजबिल वसुली मोहीम सुरू करण्यात येणार आहे. महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालया अंतर्गत औरंगाबाद, जळगाव, नांदेड व लातूर परिमंडळातील अकरा जिल्ह्यांचा समावेश होता. या जिल्ह्यांत शेतीपंप वीज ग्राहकांना कनेक्शन न मिळणे यासोबत अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. शिवाय अनेक वर्षांपासून अकरा जिल्हयातील अनेक शेतकर्यांनी वीज बिल भरलेले नसल्याचा फटका ग्रामीण भागात पायाभूत सुविधांच्या विकासाला बसत आहे. ग्रामीण भागात शेतकर्यांना वीज कनेक्शन देण्यासाठी महावितरण कार्यालयाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे शेतकर्यांकडील वीजबिल वसुली केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बागाईतदार, बडे शेतकरी यांच्याकडून थकबाकी वसूल केली जाईल. याशिवाय जे शेतकरी जास्त वीज क्षमतेचा पंप वापरत असतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.