औरंगाबादमध्ये यंदा फक्त दोन फटाका मार्केटनाच परवानगी
औरंगाबाद, दि. 15, ऑक्टोबर - औरंगाबाद शहरात यावर्षी फक्त अयोध्यानगरी व वाळूज एमआयडीसी येथे फटाका मार्केट थाटण्यात येणार आहे. टीव्ही सेंटर, राजीव गांधी मैदान, शिवाजीनगर, मुकुंदवाडी भागातील फटाका मार्केटला परवानगी मिळणार नसल्याचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी सूचित केले. यामुळे शहरात अन्य ठिकाणी फटाका मार्केट उभारण्यात येणार नाही. गेल्या वर्षी औरंगपुरा येथील फटाका मार्केटच्या आगीनंतर सुरक्षिततेचा प्रश्न एरणीवर आला होता. यावर्षी फटाका मार्केटला जिल्हा परिषदेने जागा नाकारली होती. त्यामुळे अयोध्यानगरी येथील छावणी परिषदेच्या जागेवर फटाका मार्केट उभारण्यात येत आहे. शहरातील टीव्ही सेंटर, राजीव गांधी स्टेडियम, शिवाजीनगरभागात देखील फटाका मार्केट थाटण्यात येत होते, मात्र हायकोर्टाने निवासी भागात फटाका मार्केट उभारण्यास मनाई केली. या आदेशामुळे या भागातील फटाका मार्केटवरला परवानगी मिळणार नसल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली. अयोध्यानगरी भागातील फटाका मार्केटला मात्र त्यांनी परवानगी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. दर वाढण्याची शक्यता दरवर्षी शहरात विविध ठिकाणी मिळून अडीचशे ते तीनशे फटाक्याची दुकाने थाटण्यात येतात, यंदा मात्र ही संख्या कमी झाली आहे. अयोध्यानगरी भागात केवळ 50 दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. यामुळे येथील फटाका मार्केटमध्ये दर वाढण्याची शक्यता काही व्यापार्यांनी व्यक्त केली.