Breaking News

चार कोटी रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या चालकाला अटक

पुणे, दि. 01, ऑक्टोबर - आयसीआयसीआय बँकेची सिक्युर वँल्यु इंडिया प्रा लि. कंपनीने एटीएम मध्ये भरणा करण्याकरिता असलेले चार कोटी 98 लाख 50  हजार रुपये व बोलेरो गाडी घेऊन पळालेल्या चालकाला हडपसर पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीने मुद्देमालासह अटक केली. नारायण बबन खेडेकर असे  अटक केलेल्या चालक आहे. हडपसर ससाणेनगर येथे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. सिक्युर वँल्यु इंडिया प्रा लि. कंपनीला सुरक्षारक्षकांसह अधिका-यांकडे  एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी चार कोटींची रक्कम देण्यात आली होती. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पिवळ्या रंगाच्या (चक12ङढ 3915) या पिवळ्या रंगाच्या  बोलेरो गाडीतून हे ससाणेनगर येथील एटीएमजवळ आले होते. यावेळी कर्मचारी व सुरक्षारक्षक गाडीतून खाली उतरले. ही संधी साधून चालक नारायण खेडेकर बोलेरो  गाडीसह चार कोटी रुपयांची रोकड घेऊन पसार झाला.सुरक्षारक्षक व कर्मचा-यांनी आरडाओरडा केल्यानंतरही त्याने गाडी थांबवली नाही. अधिकारी व  सुरक्षारक्षकांनी त्याची परत येण्यासाठी वाट पाहिली मात्र तो न आल्याने त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवून  शहराबाहेर जाणा-या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहन तपासणीची कारवाई सुरू केली. परंतु तोपर्यंत खेडेकर हा कर्नाटकच्या दिशेने पसार झाला. पोलिसांनी  पुढील तपास करून कर्नाटक पोलिसांच्या मदतीने खेडेकर याला मुद्देमालासहित कर्नाटकात पकडले.पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, पंकज डहाणे, गणेश शिंदे,  सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, संजय निकम, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार जवळपास 100 पोलीस व अधिकार्‍यांनी ही  संयुक्तपणे कारवाई केली.