Breaking News

’स्वच्छ ऊर्जेचे भवितव्य’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेतील विविध संशोधकांनी व्यक्त केले मत

सोलापूर, दि. 01, ऑक्टोबर - स्वच्छ,अपारंपरिक ऊर्जा हाच यापुढच्या काळातील विकासाचा मूलमंत्र आहे. सौर, पवन, जैव ऊर्जा यासारखे अनेक पर्याय  उपलब्ध आहेत. सौर ऊर्जा हा पर्याय सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो, असे मत ’स्वच्छ ऊर्जेचे भवितव्य’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेतील विविध  संशोधकांनी व्यक्त केले. विद्यापीठ सामाजिक शास्त्रे संकुलातील सेंटर फॉर फोरसाइट स्टडीज आणि फिनलँड येथील तुर्कू विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ही  आंतरराष्ट्रीय परिषद 29 आणि 30 सप्टेंबर रोजी हॉटेल सूर्या इंटरनॅशनल येथे आयोजित होती, याचा समारोप आज झाला. यावेळी अशोक मेथील (मुंबई), नितीन  परब (पुणे), तुर्कू विद्यापीठातील फिनलँड फ्युचर्स रिसर्च सेंटरचे संचालक प्रा. जिरकी लुकानेन, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. ई. एन. अशोककुमार  उपस्थित होते. अशोक मेथील म्हणाले की, सौर ऊर्जेचा पर्याय अधिक उपयुक्त वाटतो. या परिषदेत व्यक्त झालेले विचार संशोधन पत्रिकेच्या माध्यमातून जतन  करावेत, जेणेकरुन जगभरातील संशोधक यात व्यक्त झालेल्या शक्यतांवर पुढे काम करू शकतील. नितीन परब म्हणाले की, शिक्षण क्षेत्र, सरकार आणि उद्योगक्षेत्र  यांनी एकत्र येऊन ऊर्जा क्षेत्रात कार्य करावे. युवापिढीच्या सहभागातून ऊर्जेच्या क्षेत्रात चांगले कार्य झाल्यास बलशाली राष्ट्राची उभारणी शक्य आहे. प्रा. अशोककुमार  म्हणाले की, फिनलँड येथील तुर्कू विद्यापीठाच्या सहकार्याने सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलात सेंटर फॉर फोरसाइट स्टडीजची सुरुवात झाली.  भविष्यकाळाचा वेध घेणारा हा अभ्यासक्रम सुरू करून आम्ही जगभरातील प्रगत देशातील तरुण पिढीप्रमाणे आपले विद्यार्थी सक्षम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे  सांगितले. परिषदेत दुसर्‍या दिवसाच्या विविध सत्रात अशोक मेथील (मुंबई), मनोज शुक्ला (फरिदाबाद), सारी पुस्तीनन (फिनलँड), डॉ. धनराज पाटील, डॉ. जी.  एस. कांबळे, डॉ. रमेश गाढवे, डॉ. अमोल गजधाने, डॉ. विनायक धुळप, डॉ. पी. एन. होनराव, प्रा. एस. एस. काळे, अंबादास भासके आदींचे शोधनिबंध सादर  झाले. परिषदेत फिनलँड तसेच विविध राज्यातील 30 पेक्षा अधिक संशोधकांनी शोधनिबंध सादर केले. काहींनी पोस्टरद्वारेही निबंधांचे सादरीकरण केले. तेजस्विनी  कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.