Breaking News

बेशिस्त वाहतूकीला पोलिसच जबाबदार!

रस्त्याच्या मधोमध पोलिस वाहन उभे करुन वाहनधारकांची कोंडी 

बुलडाणा, दि. 01, ऑक्टोबर - नगरपालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करुन शहरातील मुख्य चौकांमध्ये सिग्नल बसविले असताना पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे  ते कायमचे बंद आहेत. कोणत्याची चौकात वाहतूक पोलिस कर्मचार्‍याची नियुक्त करण्यात आल्याचेही दिसून येत नाही. उलट पोलिसच आपले वाहन वाटेल तेथे  रस्त्याच्या मधोमध लावून वाहनधारकांची कोंडी करताना दिसतात. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ग्रामीण भागातून आलेल्या फुल  विक्रेत्यांवर पोलिसांनी चांगलीच दादागिरी दाखवली. यावेळी संगम चौकात पोलिस वाहन घेवून रस्त्याच्या मधोमध लावून वाहनधारकांची पोलिसांनीच कोंडी केली.  फुले घेवून आलेल्या विक्रेत्यांना काडीने मारणे, आणि गाडीत बसवून दमदाटी करण्याचा प्रकार सर्वासमोर घडला. हा पोलिसांचा नित्यक्रम नेहमीच दिसून येतो. त्याचा  कहर मात्र 29 सप्टेंबर रोजी दसर्‍याच्या पूर्वसंध्येला पाहावयास मिळाला. यामुळे वाहनधारकांना त्रास देवून बेशिस्त वाहतूक कोंडीला पोलिसच जबाबदार असल्याची  चर्चा नागरिकांमध्ये रंगली असून जर वाहतूकीला वळण लावणार्‍या पोलिसांकडूनच असे बेशिस्त वाहतूकीचे दर्शन होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी कुणाकडे  दाद मागायची असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आता वाहनधारकांना विनाकारण त्रास देण्यापेक्षा वाहतूकीला योग्य वळण  लावण्याचे काम करावे, अशी अपेक्षा सर्व सामान्य वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.