Breaking News

रांजणगावजवळ चार वाहनांच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू

पुणे, दि. 17, ऑक्टोबर - रांजणगाव येथील महागणपती मंदिराजवळ चार वाहनांच्या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात  सोमवारी (दि.16) रात्री झाला. दीपाली संतोष धामणे (रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिरूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुरज सुभाष तांबे (रा. लोणी, ता. राहता,  जि. अहमदनगर) यांनी रांजणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव महागणपती मंदिराजवळ एक खडी वाहतूक करणारा डंपर उभा होता.  नगरहून पुण्याच्या दिशेने येणा-या एका गाडीने डंपरला ओव्हर टेक करत असताना पुण्याकडून नगरच्या दिशेने जाणा-या गाडीला धडक दिली. या दोन वाहनांमध्ये धडक बसल्याने  पाठिमागून येणा-या गाड्या या गाड्यांवर आदळल्या. त्यावेळी दुचाकीवरुन जाणा-या दीपाली यांच्या दुचाकीला एका वाहनाची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा  जागीच मृत्यू झाला.या विचित्र अपघातात ट्रॅव्हल बस (एमपी 30 पी 413), टेम्पो (एमएच 48, टी 198) आणि एमएच 12 एडी 3033, कार (एमएच 12 पीएन 1382) या  वाहनांचे नुकसान झाले. रांजणगाव पोलीस तपास करीत आहेत.