Breaking News

नवी मुंबईच्या महापौरपदासाठी वाजू लागले पडघम

नवी मुंबई, दि. 23, ऑक्टोबर - नवी मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने राजकीय खलबत होऊ लागली आहेत. सध्या राष्ट्रवादीकडे असलेले  महापौर पद दुस-या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेने आपलयाकडे खेचून घेण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्युहूरचना  आखायला सुरुवात केली आहे. 
सत्ताधारी व विरोधकांकडून फोडाफोडीचे राजकारण होणार असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये मागील काही दिवसांपासून नाराजांची संख्या वाढू लागली आहे. नाईक यांच्या बोनकोडे गावातील मुनावर पटेल, वाशीतील दिव्या गायकवाड व इतर अनेक  नगरसेवक नाराज असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले होते. याशिवाय माजी परिवहन सभापती साबू डॅनियल यांनी नुकतीच आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. तुर्भेमधील ज्येष्ठ  नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी अनेक वेळा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्याबरोबर चार नगरसेवक आहेत. दिघा येथील गवते कुटुंबियांचे तीन नगरसेवक असून जो  दिघावासीयांना मदत करणार आम्ही त्यांच्यासोबत असल्याची घोषणा त्यांनी यापूर्वीच केली आहे. या नाराजांना शांत करण्याचे आव्हान राष्ट्रवादीपुढे आहे. यातील अनेक जर  शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा सेना नेत्यांकडून वारंवार केला जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची मुदत ऑक्टोबरमध्ये संपत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणूक होणार आहे. सध्या 111 पैकी 53 जागांवर विजय  मिळवून राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर असलातरी अपक्ष व काँग्रेसच्या कुबड्या वापरून राष्ट्रवादीने अपक्ष नगरसेवक सुधाकर सोनवणे यांना महापौरपदी बसविले होते. काँग्रेसला  उपमहापौरपद दिले.
आताही अशाच प्रकारे राषट्रवादीचा महापौर बसविण्याचे निश्‍चित झाले आहे; मात्र मागील स्थायी समितीत राष्ट्रवादीचे पक्षीय बलाबल असले, तरी शिवसेनेचा सभापती झाला होता त्या  प्रमाणे राजकीय खेळी खेळून राष्ट्रवादीला धूळ चारण्याचा डाव शिवसेनेने रचला आहे. एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन राष्ट्रवादी, काँग्रेस व अपक्ष नगरसेवकांना फोडण्याचे काम सुरू  केले असून त्यासाठी एक टीमच तयार केली आहे. राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक संपर्कात असल्याची माहिती सेनेच्या बड्या नेत्यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज असलेल्या  सर्वांशी संपर्क साधला जात आहे. अनेकांना आर्थिक प्रलोभनेही दाखविली जात आहे. दरम्यान असे असले, तरी शिवसेनेमध्येही गटबाजी असल्याने सेनेलाही महापौरपदाचे स्वप्न हे  दिवास्वप्नच ठरविण्याचा चंग राष्ट्रवादीने बांधला आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक स्वत: महापौरपदाच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. ते सेनेतील गटबाजीचा फायदा घेऊन  राजकीय आराखडे बांधत असल्याचे सूंत्रांनी सांगितले. त्यामुळे येणारी महापौरपदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असल्याचे चिन्ह आहे.