Breaking News

बेटी बचाओ, बेटी पढाओची जनजागृती करणार्‍या अंगणवाडी सेविका व आशा वर्कर देवदूत - जिल्हाधिकारी

जळगाव, दि. 16, आक्टोबर - बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची समाजात जनजागृती करुन मुले-मुलींमधील लिंग गुणोत्तराचे प्रमाण वाढविण्यासाठी काम करणार्‍या अंगणवाडी  सेविका व आशा वर्कर या सर्व समाजासाठी देवदूत असल्याचे गौरोवोद्गार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी काढले.
बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेतंर्गत बालिका सप्ताहाचा समारोप येथील नियोजन भवनात जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या उपस्थितीत झाला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन  करताना ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर महापौर ललित कोल्हे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा परिषदेचे उप मुख्यकारी अधिकारी तडवी, तहसीलदार अमोल  निकम, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, श्रीमती सरस्वती बागूल आदि उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. निंबाळकर म्हणाले की, देशात मुलींची संख्या दिवसेदिवस कमी होत चालली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला असता सन 2015 मध्ये लिंग  गुणोत्तरात जळगावचा दुसरा क्रमांक होता. त्यावेळी जिल्हयात 1 हजार मुलांच्या तुलनेत 842 मुली जन्माला येत होत्या. परंतु जिल्हयातील आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांनी या  योजनेच्या माध्यमातून चांगल्याप्रकारे जनजागृती केल्याने आता हे प्रमाण 842 वरून 903 इतके वाढले आहे. जिल्हयात लिंगनिदान होवू नये यासाठी सोनोग्राफीचे कायदे कडक क रण्यात आले आहे. यापुढेही सर्वांनी सामाजिक भावनेतून काम करुन समाजात जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
आमदार सुरेश भोळे मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपण सर्वजण समाजाचे जबाबदार नागरिक आहोत, आपलेही समाजाप्रती कर्तव्य असल्याने मुलगी वाचली तरच देश वाचेल या  भावनेतून आपण सर्वजण काम करु या असे आवाहन केले.
9 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत बालिका सप्ताहा साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत प्रशासनातर्फे घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला  स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. काटकर यांनी आपल्या प्रास्ताविका दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस बेटी बचाओ बेटी पढाओ अशी प्रतिज्ञा घेऊन या मोहिमेच्या फलकावर मान्यवरांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर विनोद ढगे व त्यांच्या सहकार्‍यांतर्फे बेटी बचाओ,  बेटी पढाओबाबत एक पथनाट्य सादर केले. बालिका सप्ताहात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात माध्यमिक गटातून  घोषवाक्य स्पर्धा- अभिषेक चौधरी, चित्रकला स्पर्धा- कौस्तुभ दीक्षित, पोस्टर्स स्पर्धा- मीनाक्षी लूले तर प्राथमिक गटातून घोषवाक्य स्पर्धा - मिलिंद पाटील, चित्रकला स्पर्धा-  आवेश मणियार, पोस्टर्स स्पर्धा- ममता तायडे यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच एकाच मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणारे जोडपे श्री वसंत पाटील व सौ. मालुबाई पाटील रा. धरणगाव यांचा तर बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत  उत्कृष्ठ कार्य करणार्‍या अंगणवाडी सेविका श्रीमती मीना परदेशी, विद्या पाटील, अनिता पाटील, उर्मिला आवटी, विद्या साळुंखे यांचाही मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्पदेऊ न सत्कार करण्यात आला.