Breaking News

कोरेगावच्या ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयातून महत्वाच्या रेकॉर्डची चोरी; गुन्हा दाखल

कोरेगाव, दि. 27, ऑक्टोबर - सातारा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या कोरेगाव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयातून महत्वाचे रेकॉर्ड असलेले 48 गठ्ठे चोरीस गेले आहेत. ऐन दिवाळीच्या सुट्टीत चोरट्यांनी रेकॉर्डवर हात साफ केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपअभियंत्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शहरातील एकदम मध्यवर्ती व गजबजलेल्या परिसरात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा क्र. 1 व 2 ची इमारत असून, तेथे आज देखील शाळा भरते. पूर्वीच्या तुलनेत जादा पटसंख्या नसल्याने पडून असलेल्या इमारतीमध्ये जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या निरनिराळ्या विभागांची कार्यालये आहेत. दिवाळीनिमित्त 17 ते 23 ऑक्टोबर दरम्यान सुट्टी होती. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय कुलूप बंद होते. इतर कार्यालयांना देखील सुट्टी असल्याने या परिसरात कोणी अधिकारी व कर्मचारी फिरकले नाहीत.
कार्यालय उघडण्याच्या लगबगीत शिपाई आल्यानंतर त्याला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यालयाचा दरवाजा सताड उघडा असल्याचे दिसले आणि त्याच्या तोंडची बोबडी वळाली.
त्याने लागलीच उपअभियंता सुधीर पत्की व कार्यालयातील इतर शाखा अभियंते-कर्मचार्यांना कार्यालयात झालेल्या चोरीची माहिती दिली. पत्की यांनी कार्यालयातून सर्व रेकॉर्डची पडताळणी केल्यावर 48 गठ्ठे रेकॉर्ड चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीत म्हटले आहे की, जवाहर विहिरींच्या रेकॉर्डचे 6, पाणी टंचाईचे अनुक्रमे 22 व 20 गठ्ठे असे एकूण 48 गठ्ठे चोरीस गेले आहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू बागवान तपास करत आहेत.