Breaking News

कंपनीचे नुकसान केल्याप्रकरणी नगरसेवकासह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल

म्हसवड, दि. 27, ऑक्टोबर - वरकुटे -मलवडी व शिरतावच्या ता. माणच्या हद्दीत सुरू असणार्‍या गिरीराज रिन्यूएबल्स प्रा.लि. या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या ठिकाणी म्हसवड नगरपालिकेचे नगरसेवक संग्राम शेटे व इतर 10 ते 12 जणांनी जाऊन त्याठिकाणी असणार्‍या कंपनीच्या कामगारांना हाकलून देण्यास सुरुवात करून शेखरभाऊ गोरे यांना न विचारता तुम्ही तालुक्यात काम कसे करता, आम्हाला हिस्यांपोटी रक्कम दिल्याशिवाय शेखरभाऊ काम करू देणार नाहीत व जो काम करेल त्याचे हातपाय तोडीन व त्याला खलास करून टाकेन असे म्हणून जेसीबीच्या साहायाने रस्ते, कंपनीचे मालकीचे बांधकाम पाडून टाकले. यात कंपनीचे सुमारे 4 लाखाचे नुकसान केले याप्रकरणी शेखरभाऊ गोरे, संग्राम शेटे यांच्यासह 10 ते 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत विशाल दिलीप पट्टेबहादूर वय 27 रा.सिडको नाशिक, सध्या दहिवडी यांनी म्हसवड पोलिसात फिर्याद दिली असून अधिक माहिती अशी, वरकुटे-मलवडी व शिरताव ता.माण या गावाच्या हद्दीत गिरीराज रिन्यूएबल्स प्रा.लि. या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. याठिकाणी नगरसेवक संग्राम शेटे,विलास पाटोळे हे 10 ते 15 लोकांसोबत राखाडी कलरची इनोव्हा, सफेद रंगाची बोलेरो व जे सी बी घेऊन प्रकल्प ठिकाणी असणार्या कामगारांना शिवीगाळ व दमदाटी करीत कंपनीचे मालकीचे कार्यस्थळावरून हाकलून दिले. व शेखरभाऊ गोरे यांना न विचारता काम कसे करता,मीच काम करणार, आम्हाला न विचारता तुम्ही काम कसे चालू केले, आम्हाला हिस्यांपोटी रक्कम दिल्याशिवाय शेखरभाऊ काम करू देणार नाहीत असे म्हणत संग्राम शेटे याने जो इथे काम करेल त्याचे हातपाय तोडीनव खलास करेन असे म्हणत कंपनीने अंतर्गत तयार केलेले रस्ते उकरून टाकले,तसेच इन्व्हर्टर रुमचे संपूर्ण बांधकाम जे सी बी चे साहायाने पाडून टाकले.यामध्ये कंपनीचे सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत शेखरभाऊ गोरे, संग्राम शेटे रा.म्हसवड, विलास पाटोळे रा.महिमानगड यांचासह 10 ते 15 जणांवर म्हसवड पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून यापैकी संग्राम शेटे,विलास पाटोळे यांच्यासह 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून म्हसवड न्यायालयात उभे केले असता 2 दिवसांची पी.सी. देण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास स पो नि मालोजीराव देशमुख हे करीत आहेत.