Breaking News

जीएसटीमधील बदल; केंद्र सरकारला जनतेच्या एकजुटीपुढे झुकावे लागले - उद्धव

मुंबई, दि. 08, ऑक्टोबर - जनतेच्या असंतोषामुळे केंद्र सरकारला वस्तू आणि सेवा करामध्ये (जीएसटी) बदल करावे लागले. सामान्य जनतेच्या एकजुटीपुढे  मस्तवाल सरकारला झुकावे लागले. सामान्य जनतेने यापुढील काळातही अशीच एकजुट दाखवावी, असे प्रतिपादन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज येथे  केले. मातोश्री येथे तातडीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
ते म्हणाले की, वस्तू आणि सेवा करातील अनेक जाचक तरतुदींविरोधात व्यापा-यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. केंद्र सरकार करावर कर लादत चालल्याने  जनतेची लूट सुरू झाली होती. या विरोधात सामान्य जनतेत असलेला असंतोष वेगवेगळ्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहचू लागला होता. या असंतोषाची झळ  आपल्याया बसल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात आल्यानेच मोदी सरकारने जीएसटीमध्ये अनेक बदल केले आहेत.
जीएसटीमध्ये केलेले बदल ही केंद्र सरकारने जनतेला दिलेली दिवाळी भेट आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मात्र जीएसटीमधील बदल म्हणजे  सरकारची भेट नसून सरकारचा नाईलाज आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, गेल्या तीन वर्षात हे सरकार आपण जनतेशी बांधील नाही अशा पद्धतीने निर्णय घेत चालले होते. पेट्रोल डिझेलचे वाढते दर, भाजीपाला -  अन्नधान्यांची महागाई याबद्दल जनतेच्या मनात मोठा असंतोष आहे. आता सर्वसामान्य माणूसही या सरकारच्या कारभाराविरुद्ध खुले पणाने बोलू लागला आहे.  यामुळेच केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आहे. यापुढील काळात केंद्र सरकारने सामान्य जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. पेट्रोल- डिझेलच्या दरात मोठ्या  प्रमाणात कपात करावी. हे दर ज्या प्रमाणात वाढवले आहेत त्यापटीत ते कमीही करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
अंगणवाडी सेविकांच्या मानधान वाढीचा प्रश्‍न सोडविल्याबद्दल ठाकरे यांनी फडणवीस सरकारचे आभार मानले. तसेच रेल्वे स्थानक परिसरातील पादचा-यांना  हटविण्यासाठी हालचाली सुरु केल्याबद्दलही त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.