Breaking News

ताण हा जीवनाचा अविभाज्य घटक -डॉ.मयुर मुठे

जळगाव, दि. 17, ऑक्टोबर - ताण हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे, हे स्वीकारा आणि त्याचे नियोजन केल्यास मानसिक आरोग्य जपता येईल असे मानसोपचार तज्ञ डॉ.मयुर  मुठे यांनी प्रतिपादन केले.रोटरी वेस्टतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त भाऊंच्या उद्यानातील ऍम्फी थिएटर येथे डॉ.मुळे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले  होते. याप्रसंगी रोटरी वेस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.सुरज जहाँगीर मानद सचिव कृष्णकुमार वाणी, जैन इरिगेशनचे कॅप्टन मोहन कुलकर्णी, वैद्यकीय समिती व प्रकल्प प्रमुख डॉ.आनंद दशपुत्रे,  डॉ.कल्पेश गांधी, सुनील सुखवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अपेक्षाभंगामुळे नकारात्मक विचार
व्याख्यानात बोलतांना डॉ.मुठे म्हणाले की, जेव्हा परिस्थिती कठीण वाटते, आपल्या क्षमता अपूर्ण पडता आहे असे वाटते, दैनंदिन जीवन शैलीत बदल जाणवतो तेव्हा ताण येतो आहे  असे वाटते. त्या संबंधी काही शारिरीक व मानसिक लक्षणे ही जाणवतात. नैराश्य व भिती एकत्र येतात. अपेक्षा भंगामुळे नकारात्मक विचार, अपयशाची भिती, राग, द्वेष या  चक्रव्युहात व्यक्ती अडकत जाते असे त्यांनी सांगितले. भूतकाळात काय झाले आणि भविष्यात काय होणार याचा जास्त विचार केल्याने ही मानसिक आजार होतात.
त्यामुळे वर्तमानकाळात सकारात्मक विचारांनी व्यसनांपासून दूर राहून जीवन जगा. मनातील नकारात्मक विचारांचा कचरा वेळीच नष्ट करा, दुःख शेअर करा, संवाद वाढवा, छंद  जोपासा, माफ करायला शिका, सोशल नेटवर्क वाढवा अशा डॉ.मुठे यांनी टिप्स दिल्या.
श्रोत्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देतांना त्यांनी मानसोपचारातील औषधी व उपचाराबद्दल बरेच गैरसमज असल्याचे सांगून नवीन तंत्रज्ञानामुळे यात खूप प्रगती झाल्याचे सांगितले. तसेच  बालसंगोपनाबाबत लहान मुलांना वयाच्या पाच वर्षापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट अर्थात मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर यापासून दूर ठेवा, मुलांना पुरेशी झोप व सकस आहार दिल्यामुळे  त्यांची चिडचिड कमी होऊन सर्वांगीण विकास होईल असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक ऍड.जहाँगीर यांनी तर सूत्रसंचालन डॉ.दशपूत्रे यांनी केले. आभार कृष्णकुमार वाणी यांनी  मानले.