Breaking News

चोपड्यात चौघांना गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक

जळगाव, दि. 17, ऑक्टोबर - चोपडा येथे गावठी कट्ट्यासह चार जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील चौघांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली. रविवारी रात्री  11.30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील लासूर गावाजवळील सत्रासेन रोडवर ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी उमर्टी येथून 25 हजारांमध्ये हा कट्टा घेतल्याची माहिती पुढे  आली असून उमर्टीत पुन्हा अवैध शस्त्रतस्करी सुरू असल्याचे या निमित्ताने सिद्ध झाले आहे.
चोपडा ग्रामीण पोलिसांना एका वाहनात चार संशयीत शस्त्रासह असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर रविवारी रात्री सापळा रचण्यात आला. लासूर गावाजवळील सत्रासेन रोडवरील  नाटेश्‍वर मंदिराजवळ पांढ-या रंगाची टवेरा (एम.एच.16 ए.टी.8723) थांबवल्यानंतर आरोपींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अंगझडती घेतली असता एका आरोपीक डे गावठी कट्टा, चार जिवंत काडतूस व मॅग्झीन आढळल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकशीत आरोपींनी कट्टा उमर्टी येथून 25 हजारात घेतल्याचे सांगितले. संशयीत  आरोपी अमीर बाळासाहेब शेवाळे (21, मन्सर, ता.आंबोगाव, जि.पुणे), पवन सुधीर थोरात (19, मन्सर, ता.आंबोगाव, जि.पुणे), किरण बाळू फरगडे (34, कलडलवाडी, ता.शिरू र, जि.पुणे), चालक नीलेश शशीकांत चौधरी (23, मन्सर, ता.आंबोगाव, जि.पुणे) यांना रात्री उशिरा अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. 25 हजारांचा कट्टा, एक  हजारांचे रिकामे मॅग्झीन, आठ हजार रुपये किंमतीचे चार जिवंत काडतूस व तीन लाख 50 हजारांचे वाहन मिळून तीन लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व पोलीस निरीक्षक भीमराव नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप सुधीर धनगर, विष्णू लक्ष्मण भील, पंकज जगन्नाथ सपकाळे, किरण  मधुकर गाडीलोहार, चालक विनोद राघो पाटीव आदींनी ही कारवाई केली.