Breaking News

जातीव्यवस्था उच्चाटन म्हणजेच समरसता- बैजनाथ राय

नागपूर, दि. 15, ऑक्टोबर - समरसता हा भारतीय जीवनमूल्यांचा एक अविभाज्य घटक आहे. मात्र, आजही जातीयवाद, अस्पृश्यतेच्या घटना कानावर येतात. त्यामुळे जोपर्यंत समाजातून जातीव्यवस्था नष्ट होत नाही तोपर्यंत खर्‍या अर्थाने समरसता आली असे म्हणता येणार आहे. एका अर्थाने जातीव्यवस्थेचा अंत करणे म्हणजेच समतावादी समाजाची निर्मिती करणे होय, असे प्रतिपादन भारतीय मजदूर संघाचे माजी अखिल भारतीय अध्यक्ष बैजनाथ राय यांनी केले.
भारतीय मजदूर संघाच्या वतीने आयोजित दत्तोपंत ठेंगडी स्मृती दिनानिमित्त ‘समरसता दिना’चे आयोजन करण्यात आले होते. देवी अहल्या मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बैजनाथ राय म्हणाले की, भारतीय संस्कृती ही समरसतेवर आधारीत आहे. भारतातील प्रत्येक धर्म हे समतेची शिकवण देतात. कुठलाही धर्म हा दुजाभाव शिकवत नाही. असे असतानाही समरसता ही हवी त्या प्रमाणात रुजताना दिसत नाही हे दु:ख आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सण, उत्सव हे सर्वांना एकत्रित आणत समाजामध्ये एकोपाची भावना निर्माण करण्याासाठी आहे. वसुधैव कुटुंबकम् ही भारतीय शिकवण आहे. याचा अर्थच समतेशी जुळून आहे. समरसतेमध्ये परिवाराची भावना फार महत्त्वाची ठरते. संयुक्त कुटुंबात एक व्यक्ती कमवायचा आणि सर्वांमध्ये त्याचे समान वाटप करायचा. पण आता संयुक्त कुटूंब पद्धतीच राहिली नाही. जर परिवार एक नसेल तर समरसता टिकणे कठीण होइल अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
लग्न पद्धतीमध्ये जातीतील व्यक्तीशीच लग्न केले जाते. मात्र, लग्न करताना हुंडा घेतला जातो. हा हुंडा स्वजातीच्या व्यक्तीकडूनच घेतला जातो. म्हणजे जातील व्यक्तीच आपल्या जातीच्या व्यक्तीला लूटतात. अशा पद्धतीत रुढ असतील समता निर्माण होणे कठीण आहे. त्यामुळे जातींचा अंत होणे आवश्यक आहे. जातीयवाद आणि घराणेशाहीला कंटाळूनच लोकांनी समरसतेसाठी मोदींना निवडून दिले अशी पुष्टीही त्यांनी जोडली. समरसता हा जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. दत्तोपंत ठेंगडी यांनी आयुष्यभर समरसतेसाठी कार्य केले. त्यांच्या स्मृती दिनी केवळ आठवण म्हणून कार्यक्रम साजरा करण्यापेक्षा समरसतेचे मूल्य जीवनात रुजवावे असा आशावादही बैजनाथ राय यांनी व्यक्त केला.