Breaking News

नियोजनशून्य पद्धतीने झाली कर्जमाफी, शरद पवारांची राज्य सरकारवर टीका

नागपूर, दि. 23, ऑक्टोबर - राज्य सरकारने केलेली कर्जमाफी नियोजनशून्य पद्धतीने झाली आहे. ज्या शेतकर्‍यांनी कर्जच घेतले नाही, अशांना कर्जमुक्तीची पत्रे देण्यात आल्याची  टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, सोमवारी नागपुरात केली. अमरावती येथे आयोजित सत्कार समारंभात सहभागी होण्यासाठी विदर्भात आले असता नागपूर  विमानतळावर ते पत्रकरांशी बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले की, राज्य सरकारने कर्जमाफीचा चांगलाच गाजावाजा केला. परंतु, प्रत्यक्षात कर्जमाफी करताना खूप त्रुटी झाल्यात. ज्या शेतकर्‍यांनी कर्ज काढले नव्हते आशा  शेतकर्‍यांना सरकार कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देऊन मोकळे झाले. हे नियोजनशून्य कारभाराचे द्योतक आहे. त्यामुळे यात सुधारणा करण्यासाठी आम्ही सरकारला 15 दिवसांचा  वेक देतो. सुधारणा झाली तर ठीक अन्यथा पुढची दिशा ठरवावी लागेल असा इशारा त्यांनी दिला.
किटनाशक फवारणी करताना झालेल्या मृत्यूबद्दल पवार म्हणाले की, कीटकनाशक नियंत्रणासाठी कायदा व संस्था आहे. संस्थेच्या परवानगीशिवाय कुठलेही कीटकनाशक बाजारात  येऊ शकत नाही. आम्ही आमच्या काळात यासंदर्भातील नियमांचे काटेकोर पणे पालन केले. कंपन्यांनी नियमभंग केल्यास त्यावर कठोर कारवाई देखील केली. परंतु, गेल्या 3 वर्षात  काय झाले माहित नाही. मोठ्या प्रमाणात नॉनसर्टीफाईड किटनाशके बाजारात विक्रीसाठी आली आहेत. राज्यातील शेतकर्‍यांचे झालेले दुर्दैवी मृत्यू त्याचेच दुष्परिणाम आहेत. या प्रक रणात संबंधित दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली. परतीच्या पावसामुळे विदर्भात सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान झाले आहे . विविध  जिल्ह्यातून त्यासंबंधी माहिती मिळते आहे. केंद्र व राज्य शासनाने नियमात अडकून न पडता आऊट ऑफ वे जाऊन शेतकर्‍यांना मदत करण्याची गरज असल्याचे पवार यांनी सां गितले. दरम्यान उद्धव आणि राज यांच्यातील कलगीतुर्‍यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.