Breaking News

थकबाकीमुळे नगरचा पाणी पुरवठा व पथदिवे बंद होण्याची शक्यता

अहमदनगर, दि. 23, ऑक्टोबर - महापालिकेची आर्थिक स्थिती नाजुक असल्याच्या दरम्यानच भविष्य निर्वाह निधी आयुक्ता लयाने मनपाचे विजया बँकेतील एक महत्वाचे खाते  सील केल्याने आता महापालिकेतील आर्थिक व्यवहार जवळपास कोलमडले आहेत.येत्या काही दिवसांमध्ये त्याचा फटका नागरिकांना बसण्याची चिन्हे आहेत.वीज बिलापोटी महा वितरण कंपनीला दिलेले 70 लाखाचे चेक परत आले असून थकबाकी तातडीने जमा करण्याच्या मागणीसाठी पाटबंधारे विभागानेही मुळा धरणातून पाणी पुरवठा बंद करण्याचा  इशारा मनपाला दिला आहे.त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा व पथदिवे बंद होण्याची चिन्हे आहेत.
अहमदनगर महापालिकेचे अंदाजपत्रक 587 कोटी रूपयांचे आहे.महापालिकेला 600 कोटी रूपयांची देणी आहेत.त्यामध्ये महावितरण वीज कंपनीची थकबाकी ही तब्बल 153 कोटी  रूपये इतकी आहे. ठेकेदारांचे 35 कोटी, कर्मचार्यांचे 20 कोटी देणी बाकी आहेत.या आकडेवारीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण अतिशय कमी आहे.त्यामुळे मनपाचे आर्थिक नियोजन  सध्या पूर्णपणे कोलमडले आहे. पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद केल्यानंतर थकित वीज बिलापोटी महापालिकेने महावितरण कंपनीला 70 लाख रूपयांचे धनादेश दिले होते. दरम्यान  मनपातील सेवानिवृत्त कर्मचा-यांना दिवाळीसाठी थकित निवृत्ती वेतन देण्यासाठी ही रक्कम वापरावी लागली.त्यामुळे मात्र बँकेत रक्कम नसल्याने महावितरणला दिलेले धनादेश न  वटल्याने परत आले.त्यामुळे महावितरण कंपनीकडून पुन्हा एकदा पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद केला जाण्याची शक्यता आहे.नगर शहराला केल्या जाणार्या धरणातील पाण्याच्या  बिलाची थकबाकी दिवसेंदिवस वाढ आहे.या पाश्वभूमीवर पाटबंधारे विभागाने देखील महापालिकेला मुळा धरणातून केला जाणारा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. दिवाळीमध्ये कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान,वेतन व निवृत्त कर्मचारी वेतन यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासनाला खर्च करावा लागला आहे.त्यामुळे मनपाची तिजोरी जवळपास रिकामी  झाली आहे.एकूणच या सर्व घडामोडींमुळे येत्या काही दिवसांमध्ये शहराचा पाणी पुरवठा तसेच पथदिवे बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.