Breaking News

कर्जमाफीचे अर्ज सादरीकरणाचे काम अपूर्ण असल्यास पूर्ण करा : पालकमंत्री

अहमदनगर, दि. 15, ऑक्टोबर - राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफी दिली आहे. या योजनेतंर्गत ऑनलाईन भरलेले अर्ज बँकांनी ऑडीट  करून शासनाकडे सादर केलेले आहेत. त्यामध्ये जिल्हा आघाडीवर आहे. मात्र याबाबत काही अर्ज अपूर्ण असल्यास ते त्वरित सादर करावे, अशा सूचना पालकमंत्री पांडुरंग फुंडकर  यांनी आज दिल्या.  
कर्जमाफी योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये  आज 14 ऑक्टोंबर 2017 रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत  होते. याप्रसंगी आमदार डॉ. संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपविभागीय अधिकारी नरेंद्र टापरे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुभाष बोंदाडे, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक प्रभाकर श्रोते आदी  उपस्थित होते.
बँकनिहाय ऑनलाईन अपलोड अर्ज, ऑडीट करून शासनाला सादर केलेले अर्ज यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीप्रसंगी बँकांचे प्रतिनिधी, कृषि विभागाचे अधिकारी,  सहकार  विभागाचे अधिकारी व  संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.