Breaking News

महापालिका मुख्यालयात अवतरला पाना-फुलांचा आकर्षक ’मोर’

मुंबई, दि. 16, ऑक्टोबर - मुंबई महानगरीच्या नागरी सेवा सुविधांची काळजी वाहण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणा-या बृहन्मुंबई महापालिकेची ऐतिहासिक वास्तू यावर्षी 125 वर्षे  पूर्ण करीत आहे. या ऐतिहासिक वास्तूत आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच ’वसुबारस’ च्या दिवशी आपला राष्ट्रीय पक्षी असणारा, लहान थोरांचा लाडका ’मोर’अवतरला  आणि त्याला बघायला आणि त्याच्यासोबत ’सेल्फी’ काढायला अभ्यागतांसह महापालिका अधिकारी - कर्मचा-यांचीही गर्दी झाली. महापालिकेच्या बगीच्यांमधील फुलांचा वापर क रुन पुर्णाकृती ’पुष्प मयूर’ महापालिकेच्या उद्यान विभागाने साकारला. ’पर्यावरण वाचवा आणि पर्यावरण वाढवा’ असा संदेश घेऊन आलेल्या या मोरासह महापालिकेच्या मुख्य  प्रवेशद्वाराजवळ फुलांनी साकारलेला शुभ दीपावलीचा फलकही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिक्षक श्री. जितेंद्र परदेशी व त्यांच्या सहका-यांनी काल रविवारी सुट्टीच्या दिवशी आणि आज सकाळी महापालिकेच्या विविध उद्यानांमधून आक र्षक फुले, झाडांच्या तुटून पडलेल्या फांद्या आदी सामुग्री जमा करुन अक्षरशः खरा भासणारा हा ’पुष्प मयूर’ साकारला आहे. हा मोर तयार करण्यासाठी विविध रंगी ऑर्कीड,  पिवळा झेंडू, केशरी झेंडू, शेवंती, शोभेची फुले व पाने यासारख्या महापालिकेच्याच उद्यानांमधील फुलांचा वापर करण्यात आला आहे. तर मोराचा पिसारा तयार करण्यासाठी  उद्यानातील निर्माण होणा-या कच-यातील झाडाच्या काड्यांचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती श्री. जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. या पुष्प मयूरच्या निमित्ताने ’मोर’ आ णि ’पर्यावरण’ हे आज महापालिकेच्या ’कॉरिडॉर’ मधील चर्चेचा विषय ठरले.