Breaking News

दिवाळीचे मुख्य दिवस संपल्याने महाबळेश्‍वरमध्ये पर्यटकांची गर्दी

महाबळेश्‍वर, दि. 24 (प्रतिनिधी) : दिवाळी सुट्टी संपली असली तरी शाळा-महाविद्यालयांच्या दिवाळीच्या सुट्ट्या अजून सुरू आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या नजरा आता निसर्गरम्य  असणार्‍या महाबळेश्‍वरकडे वळल्या आहेत. मिनी काश्मिर मानले जाणारे महाबळेश्‍वर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. ऑर्थरसिट, वेण्णालेकसह सर्वच पॉईंटवर गर्दी वाढू लागली  असून वाहतुकीची कोंडीही होवू लागली आहे. वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र वाहतूक शाखा काम करत आहे.
महाबळेश्‍वर सध्या दिवाळीच्या सुट्ट्यामुळे फुलले असून या ठिकाणी पर्यटकांची मोठी रेलचेल पाहवयास मिळते. दिवाळीच्या सुट्टीमुळे गुजरात राज्यामधून आलेल्या पर्यटकांची संख्या  अधिक असून केट्स पॉईंट, ऑर्थरसीट पॉईंट, क्षेत्र महाबळेश्‍वरसह सुर्यास्तासाठीचा प्रसिध्द मुंबई पॉईंट ही स्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. प्रसिध्द वेण्णा लेकमध्ये नौका  विहाराचा आनंद पर्यटक लुटताना पाहावयास मिळत आहेत. नौकाविहारासोबत घोडेसवारी, गेम्स, स्ट्रॉबेरीपासून बनविलेले विविध खाद्य पदार्थ याची पर्यटक खरेदी करत आहेत. सलग  आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्‍वर गजबजून गेले आहे. वेण्णा लेक परिसरात पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी येथील मुख्य  बाजारपेठा सजल्या असून मोठ्या प्रमाणावर पर्यटक खरेदीसाठी बाजारपेठेत येत आहेत. बाजारपेठेतील प्रसिध्द चप्पल, चणे, जाम खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. नगरपालिकेने  वाहनतळ तसेच ठिकठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. वेण्णा लेक यासह काही ठिकाणी वाहतूकीच्या कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागत आहे.