Breaking News

वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूलची हवी कणखर भूमिका

। बेसुमार उपश्यामुळे पर्यावरणाची हानी, गुंडाच्या टोळ्यांचे आव्हान

अहमदनगर, दि. 02, ऑक्टोबर - गेल्या काही वर्षांपासून वाळुचा धंजा चांगलाच तेजीत आहे. पण तेवढया तेजीत सरकारचे उत्पन्न काही वाढत नाही, यावर उपाययोजना करण्याऐवजी काही वाळू साठ्यांचा लिलाव करून जेमतेम उत्पन्न महसूलला मिळते, परंतु त्यापेक्षा कितीतरी पट उत्पन्न वाळू तस्कर मिळवितात. हा आतबट्टयाचा व्यवसाय केव्हा रोखला जाणार असा प्रश्‍न आहे.
बरे वाळुची फक्त तस्करीच होते असे नाही तर त्यातून ग्रामीण भागात वातावरणही कलुषित होते. म्हणजे एकाचवेळी महसुलाचाघाटा आणि पोलिसांची डोकेदुखी अशी परिस्थिती तयार होते. हे टाळण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याची गरज आहे.
वाळुचा व्यवसाय पाच ते सात वर्षापासून भलताच तेजीत आला आहे आणि वाळुला सोन्याचे मोल  आले आहे. शहराचे दिवसेंदिवस होणारे विस्तारीकरण, नवीन बांधकामांची वाढती संख्या यामुळे वाळुला प्रंचड भाव आला आहे. प्रशासनाच्या मवाळ  भूमिकेतून वाळू तस्करांचा जन्म झाला. त्यामुळे एकीकडे  वाळू उपशामुळे पर्यावरणाचा तोल ढासळत असताना कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याची ताकद वाळू तस्करांमध्ये आली  आहे. यातून अनेक प्रश्‍न निर्माण होतात. पण याची म्हणावी तशी गांभीर्याने दखल घेतली जात नाही.
जिल्ह्याच्या उत्तर व दक्षीण भागात वाळु तस्कारांचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे. तस्करांचे काही पुढार्‍यांशी, सरकारी अधिकार्‍यांशी असणार्‍या जानपहनाचा फायदा वाळू तस्कर उठवित असतात. सरकारला वाळुंच्या साठयांच्या लिलावापासून मोठे उत्पन्न मिळत असल्याचे प्रशासनाचे म्हणने असले तरी प्रशासनाला मिळणारा हा नफा तसा फार कमी  आहे. कारण ठेकेदार जो ठेका घेतात. त्या ठिकाणची वाळू किती उचलली जाते? किती महिने उपसा केला जातो. नदीमध्ये किती खोलपर्यंत वाळू उपसा करायचा याचेही काही नियम राबविले जात नाही. प्रशासन ठेका देऊन ठेक्याची रक्कम घेते, पंरतु वाळू ठेकेदार प्रचंड नफा या ठेक्यातून मिळवितात. यावर प्रशासनची नजर नसते. अव्वाच्या सव्वा नफा मिळविला  जात  असला तर तो एक प्रकाराची फसवणूकच आहे. वास्तविक पाहता वाळुच्या ठेक्याची किंमत प्रशासनाने वाढवून घ्यायला हवी. पण प्रशासन फारसे गांभीर्याने हे घेत नाही, असेच दिसते. तसे असते तर प्रशासनला मोठा फायदा वाळुच्या व्यवसायातून झाला  असता.
ज्या नदीचे ठेके दिले जातात, त्या व्यतिरिक्त इतर नद्यांचे काय ? मोठया नद्यापेंक्षा छोठया नद्यांमधील वाळुचा उपसाही चिंताजनक आहे. याची कोणी दखल घेत नाही. नुकतेच श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला येथील वाळू तस्करीबाबत तक्रार करण्यात आली  आहे. नदीला पाणी असूनही वाळु उपसा करणारे बिनधास्तपणे नदीमध्ये अवजड यंत्र सामुग्री वापरूनपाण्यात खड्डे करून वाळू उपसा करीत  आहे. ग्रामस्थांचा विरोध असतानाही वाळू उपसा करणारे त्याकडे दुर्लक्ष करतात, याचाअर्थ या वाळुचा ठेका दिलेला नाही,  असेच दिसते. तसे असते तर गावकर्‍यांची त्याची कल्पना असते. सांगवी दुमाला येथील वाळू उपसा हे एक उदाहरण आहे. दुसरीकडे किती उपसा होत असेल याची गणतीच नाही.
हे झाले वाळू उपशाबद्दल, पण यातुन होणार्‍या मारामार्‍या चिंता निर्माण करणारी आहे. यातुन अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्यातर वाळुचा उपसा बेकायदेशीपणे करतात. परंतु त्यांना विरोध करणार्‍या महसुलच्या अधिकार्‍यांना, कर्मचार्‍यांवर हल्लेही करतात. नेवासा तालुक्यात तर गुंडाच्या टोळ्याच तयार झाल्या असून अनेक टोळ्यांकडे पिस्तुल, तलवारी अशी घातक हत्यारे आहेत. त्यामुळे या टोळ्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. यापूर्वी अनेक कर्मचार्‍यांना प्राणास मुकावे लागले आहे.
महसूल आणि पोलिस यांनी एकत्र येऊन कडक कारवाई केलीतर  वाळू तस्करीला बर्‍यापैकी आळा बसू शकेल तसेच भविष्यात या दोन्ही खात्यांचा दरारा राहील अन्यथा परिस्थिती अवघड होत जाणार हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज पडणार नाही.