Breaking News

नगरमध्ये सवारीची मिरवणूक शांततेत

। मोहरमनिमित्त सरबताचे वाटप,धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

अहमदनगर, दि. 02, ऑक्टोबर - शहरात मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या सवारी मिरवणुका शांततेत पार पडल्या. मिरवणूक पाहण्यासाठी मुस्लिम बांधवाबरोबरच इतर धर्मियांनीही गर्दी केली होती. दुपारी तीनच्या सुमारास मिरवणुकांना प्रारंभ झाला.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आल्याने शांततेत मिरवणूक निघाली.
नगरचा मोहरम सण प्रख्यात असून येथील सवार्‍यांची मिरवणूक पाहण्यासाठी राज्यातून लोक येतात. दरम्यान सवारी मिरवणुकीच्या आदल्या दिवशी कत्तलकी रात्र असते. या वेळीही टेंबा मिरवणूक काढली जाते. किरकोळ प्रकार वगळता हीही मिरवणूक शांततेत पार पडली.
आज दुपारी कोठला येथून  इमाम हसन व हुसेन यांच्या सवारीची मिरवणूकीस प्रारँभ झाला. कोठला मैदान येथे या वेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे औरंगाबाद रस्त्यावर काही काळ गर्दी होऊन वाहतुकीवर परिणाम झाला. रहदारी मंदगतीने चालत होती. नंतर या सवार्‍या पुढे सरकल्या. कोठला मैदान येथून छोटे इमाम तर मंगलगेट  हवेली येथून बडे इमाम याचीं सवारी निघाली. ही मिरवणूक कोठला मैदान ते मंगलगेट, जुनी महापालिका, कोर्टगल्ली, दिल्लीगेट, बालिकाश्रमरोड  मार्गे गेली. मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर भाविकांसाठी सरबतांचे वाटप करण्यात येत होते. सवारीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. मोहरम मिरवणुकीचा बंदोबस्ताचे नियोजन चांगल्या पद्धतीने पोलिसांनी केली. पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या अनेक वाहने सवारी मिरवणुकीमागे येत  होती.  इमारतीवर ठिकठिकाणी वॉकटाकी लावण्यात  आली होती. तेथेही पोलीस तैनात होते. त्यांची सर्वत्र नजर होती. सांयकाळी मिरवणुकीने वेग घेतला.