Breaking News

...तरच सर्व प्रादेशिक पाणीयोजना सुरळीत चालतील : कार्ले

जिल्हा परिषदेत प्रादेशिक पाणी पुरवठा योजना देखभाल दुरूस्ती व पाणीपट्टी वसुलीसंदर्भात कार्यशाळा

अहमदनगर, दि. 09, ऑक्टोबर - प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना यशस्वीपणे चालविण्यासाठी लोकसहभाग व प्रशासनाचे सहकार्य महत्त्वाचे असते. गावांच्या  स्थानिक योजनेला पाणी आल्यावर प्रादेशिक पाणी योजनेतून पाणी घेण्यास गावांचा नकार मिळतो. त्यामुळे पाणी योजना बंद ठेवावी लागून मशिनरी, यंत्रसामुग्री  खराब होते. त्यासाठी प्रादेशिक योजना वर्षभर चालवणे गरजेचे आहे. या योजनांसाठी स्वतंत्र सौर उर्जा प्रोजेक्ट उभारल्यास विद्युत देयकांचा मोठा प्रश्‍नही निकाली  लागू शकतो. प्रायोगिक तत्वावर घोसपुरी, बारागाव नांदूर व बुर्हाणनगर पाणी योजनांसाठी सौर उर्जा प्रोजेक्ट कार्यान्वीत करावेत. योग्य नियोजन व जाणीवपूर्वक  प्रयत्न केल्यास जिल्ह्यातील सर्वच प्रादेशिक पाणी योजना चांगल्या पध्दतीने चालू शकतात व संबंधित गावांना शाश्‍वत पाणी पुरवठा होवू शकतो. यासाठी लोकसहभाग,  शासकीय यंत्रणांचा सकारात्मक प्रतिसाद आवश्यक आहे, असा विश्‍वास जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरूस्ती व पाणी पट्टी वसुलीसंदर्भात जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत  माने यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी घोसपुरी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष म्हणून या योजनेच्या यशस्वीतेची यशोगाथा  सांगताना कार्ले बोलत होते. याप्रसंगी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे, उपमुख्य कार्यकारी  अधिकारी प्रशांत शिर्के, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम, बारागाव नांदूर पाणी योजनेचे अध्यक्ष शिवाजी गाडे, सभापती रामदास  भोर, अनिल कराळे आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत संदेश कार्ले व शिवाजी गाडे यांनी अनुक्रमे घोसपुरी पाणी योजना व बारागाव नांदूर पाणी योजनेच्या यशस्वी कार्यान्वयाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.  तांत्रिक अडचणी सोडविणे, पाणी पट्टी वसुली, पाणी गळती रोखणे आदींसाठी केलेल्या उपाययोजनांची व त्याला मिळालेल्या ग्रामस्थांच्या प्रतिसादाबाबत त्यांनी  सविस्तर माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने म्हणाले की, जिल्ह्यात 44 प्रादेशिक पाणी योजनांपैकी 2 योजना नफ्यात चालत आहेत. या दोन्ही पाणी योजनांचा आदर्श  डोळ्यासमोर ठेवून अन्य पाणी योजनाही चांगल्या पध्दतीने चालविण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील. पाणीपट्टी वसुलीसाठी चित्रफितीच्या माध्यमातून  प्रसार व प्रचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांनी प्रास्ताविक केले. माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ रवींद्र ठाणगे यांनी आभार मानले. कार्यशाळेस जिल्ह्यातील गट  विकास अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंता, प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांचे अध्यक्ष, सचिव, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेचे संपूर्ण  नियोजन शाखा अभियंता चंद्रकांत गागरे यांनी केले.