Breaking News

राज ठाकरेंच्या सक्रियतेने शिवसेना नेते धास्तावले

मुंबई, दि. 27, ऑक्टोबर - लोकसभा , विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतील पराभावामुळे आलेली मरगळ झटकून राज ठाकरे संघटना बांधणीच्या उद्देशाने जोमाने बाहेर  पडल्याने शिवसेना नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता आली आहे. शिवसेनेच्या नेतृत्त्वाची सध्याची कार्यशैली पाहिली तर येत्या काही दिवसांत शिवसेनेतून मनसे  मध्ये जाणार्‍यांची संख्या वाढू लागेल अशी भीती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने हिंदुस्थान समाचार शी बोलताना व्यक्त केली . नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बोलताना हा नेता  म्हणाला की , शिवसेना नेतृत्वाच्या सध्याच्या कार्यशैलीबद्दल सामान्य कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केवळ बाळासाहेबांचा मुलगा म्हणून आत्मीयता  आहे . बाळासाहेब हयात असताना त्यांना दु:ख होईल म्हणून अनेक नेते , कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या पक्षात जाणे टाळले . बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेच्या  सहानुभूतीदारांचा ओढा राज ठाकरेंकडे वळू लागला होता . मात्र 2013 च्या उत्तरार्धात नरेंद्र मोदी यांनी जबरदस्त प्रचार यंत्रणेने सारे वातावरण बदलून टाकले. नेमक्या त्या काळात  टोल नाका विरोधी आंदोलन व अन्य प्रकरणांमुळे राज ठाकरेंची प्रतिमा तोड करणारा नेता अशी झाली . मोदी लाटेमुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार  निवडून आले.
हा ज्येष्ठ नेता पुढे म्हणाला की , उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आघाडीचं उघडली आहे . भाजपने केंद्रात आणि राज्यात शिवसेनेला हवा तसा सत्तेचा वाटा देण्यास नकार  दिल्याने उद्धव ठाकरेंचा तीळपापड झाला आहे. सत्तेत राहून भाजप विरोधात भूमिका घेण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय शिवसेनेच्या अनेक नेत्यांना पसंत नाही . त्या पेक्षा सत्तेतून बाहेर  पडणे चांगले , असे सेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांचेही मत आहे . नोटबंदी विरुद्ध उद्धव ठाकरेंनी महापालिका प्रचारात रान उठवूनही भाजपने मुंबईत 82 जागा स्वबळावर पटकावल्या  . राज ठाकरे महापालिका निवडणुकीत वैयक्तिक कारणांनी अडचणीत होते . राज ठाकरे थोडे आधी सक्रीय झाले असते तर महापालिका निवडणुकीतच शिवसेनेला दणका बसला  असता , असेही हा नेता म्हणाला .
राज्यात सध्या प्रभावी विरोधी पक्षाची उणीव आहे . ही उणीव राज ठाकरे आपल्या आक्रमक शैलीने भरून काढू शकतात . त्यामुळेच शिवसेनेचे सामान्य कार्यकर्ते राज ठाकरेंच्या  पक्षाकडे आकर्षित झाल्यास नवल वाटायला नको , असेही या जयेष नेत्याने नमूद केले .
सेनेच्या दसरा मेळाव्यानंतर सेनेचे कार्यकर्ते जवळच असलेल्या कृष्णकुंज कडे गेले आणि त्यांनी राज ठाकरेंना बाहेर येण्याची विनंती केली . राज ठाकरेंनी ही विनंती मान्य केली आ णि ते सेनेच्या या कार्यकर्त्यांना बाहेर येऊन भेटले . यावरून सेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांचा मड लक्षात येतो असेही हा नेता म्हणाला.