Breaking News

रोहिलागडच्या महिलांनी मतदानाद्वारे दारूचे दुकान केले बंद

जालना, दि. 27, ऑक्टोबर - अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील महिलांनी गावातील दारू बंद करण्यासाठी मागणी करत मतदानात दारू विरोधी मतदान करून गावातील देशी  दारूचे दुकान बंद करण्यास भाग पाडले आहे. या गावात 15 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत दारू बंद करण्याचा ठराव करण्यात आला होता. यापूर्वी येथील महिलांनी जालना येथे  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दारूबंदी करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर काही कारवाई न झाल्याने महिलांनी आक्रमक होत या विषयावर कायद्यानुसार मतदान  घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार झालेल्या मतदानात गावातील एक हजार 464 पैकी 842 महिलांनी देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी मतदान केले. त्यामुळे गावातील हे  दुकान बंद करण्यात येणार असल्याचा आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिला आहे.